मराठवाडा विद्यापीठात परीक्षा निकालासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ठिय्या आंदोलन 

21

विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षा निकालात अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यापूर्वी निकाला संदर्भात अभाविपच्या वतीने अनेक वेळेस निवेदन देण्यात आले. मात्र अद्यापही विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटलेला नाही.त्यामुळे औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात परीक्षा निकालासाठी आज गुरुवारी (ता.१७) अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने (अभाविप) ठिय्या आंदोलन करण्यात आले.

यावेळी महानगर मंत्री निकेतन कोठारी, सहमंत्री उमाकांत पांचाळ, ऋषिकेश केकान, स्नेहा पारिक, जिल्हा संयोजक श्यामसुंदर सोडगीर, नागेश गलांडे, जिल्हा सहसंयोजक अंबादास मेव्हनकर, शुभम फाळके, सुभाष बोडखे, धनंजय शेरकर, अंगद खरात, विशाल गिरी, अनिकेत डोहाळे, निखिल सोनी, उमेश भताने, दीपक टोणपे, तुषार साळुंके यांच्यासह पदाधिकारी, विद्यार्थी उपस्थित होते.

चुकीचे लागलेले निकाल तात्काळ दुरुस्त करण्यात यावे. सरासरीनुसार उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांचा निकाल नापास दाखवत आहेत,त्यात तत्काळ दुरुस्ती करावी. अद्यापही न लागलेल्या विषयांचे निकाल त्वरित घोषित करावे. डिप्लोमा करून थेट द्वितीय वर्षाला प्रवेशित अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे मागील तीन वर्षाचे रखडलेले पदवी प्रमाणपत्र तत्काळ देण्यात यावे. विद्यार्थ्यांना निकालात असणाऱ्या त्रुटी ऑनलाइन पद्धतीने मांडण्यासाठी पर्याय निर्माण करावा व विद्यापीठ परिक्षेत्रातील महाविद्यालय नियमित सुरू करण्यात यावी, अशा मागण्या प्र.कुलगुरु श्‍याम शिरसाठ यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.