अलिबाग तुरुंग प्रशासनाची मोठी कारवाई; अर्णव गोस्वामींना मोबाईल पुरवणारे २ पोलीस निलंबित

9

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणातील आरोपी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना क्वारटांईन सेंटरमध्ये फोन पुरवण्याऱ्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. अर्णव गोस्वामींना 5 आणि 6 नोव्हेंबर रोजी मोबाईल पुरवण्यात आल्याचा प्रकार घडला होता. याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. अलिबाग तुरुंग प्रशासनाने ही कारवाई केली आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णव गोस्वामी हे न्यायालयीन कोठडीत आहे. कोरोनाच्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन आरोपींना तुरुंगात ठेवण्याआधी १४ दिवस क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं होतं. हे सेंटर नगरपालिका शाळेत होतं. दरम्यान काही कर्मचाऱ्यांनी  गोस्वामी यांना मोबाईल फोन पुरवल्याचा आरोप होता. त्यानंतर अर्णव गोस्वामींच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता त्यांना अलिबागहून तळोजा जेलमध्ये हलवण्यात आलं होतं.

अलिबाग तुरुंग प्रशासनाने क्वारटांईन सेंटर असलेल्या नगरपालिका शाळेत बंदोबस्तास असलेल्या 2 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची कारवाई केली आहे. मोबाईलवरुन अर्णव गोस्वामी यांनी एक फोन केल्याचेही समजते. त्यामुळे पोलिसांकडून या सगळ्याची अंतर्गत चौकशी करण्यात आली. मात्र, भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी अर्णव गोस्वामी यांना लगेचच तळोजा कारागृहात हलवण्यात आले आहे.