प्रसिद्ध अभिनेत्री, स्टँडअप कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना ड्रग्ज प्रकरणात जामीन मिळाला आहे. विशेष एनडीपीएस न्यायालयाने या दोघांना जामीन मंजूर केला. न्यायालयाच्या या निर्णयावर एनसीबीने मात्र नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय भारतीला मिळालेला जामीन रद्द करावा, यासाठी त्यांनी एनडीपीएस न्यायालयात पुन्हा एकदा याचिका दाखल केली आहे. त्यांना पुन्हा एकदा अटक करुन चौकशी करण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती एनसीबीने कोर्टाकडे केली आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथकाने कॉमेडियन भारती सिंहच्या घरावर २३ नोव्हेंबर रोजी छापा टाकला. त्यावेळी तिच्या घरात अंमली पदार्थ आढळून आल्यामुळे एनसीबीने शनिवारी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचियाने अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याची कबुली दिल्यानंतर एनसीबीने तिला ‘एनपीडीएस’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. त्यानंतर या दोघांना न्यायालयाने १४ दिवसांची म्हणजे ४ डिसेंबरपर्यंत न्यायलयीन कोठडी सुनावली. ज्यानंतर भारती आणि तिच्या पतीने जामिनासाठी अर्ज केला होता. जो मंजूर करण्यात आला असून दोघांनाचाही जामीन मंजूर झाला आहे.
कोण आहे भारती सिंह?
भारती सिंह ही एक प्रसिद्ध विनोदी अभिनेत्री आहे. २००८ साली ‘द ग्रेड इंडियन कॉमेडी शो’ या स्पर्धेतून भारतीने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने ‘कॉमेडी सर्कस’, ‘कॉमेडी सर्कस के सुपरस्टार’, ‘कॉमेडी सर्कस का जादू’ यांसारख्या अनेक स्टँडअप कॉमेडी शोमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. याशिवाय ती ‘एफ. आय. आर.’, ‘बिग बॉस’, ‘अदालत’, ‘खिलाडी 786’, ‘सनम रे’ यांसारख्या अनेक मालिका आणि चित्रपटांमध्येही झळकली आहे.