मराठीच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर अॅमेझॉन बॅकफूटवर गेलं आहे. अॅमेझाॅन आणि मनसेच्या वादात अखेर अॅमेझाॅनने माघार घेतली आहे. अॅमेझाॅनच्या संकेतस्थळावर मराठी भाषेचा समावेश करण्यात येणार आहे. ॲमेझाॅनवर काही वेळातच मराठीची घोषणा होणार असल्याची माहिती या प्रकरणी पाठपुरावा करणारे मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी दिली आहे.
मराठीच्या मुद्द्यावरुन मनसे प्रचंड आक्रमक झाली असून राज्यभरात अॅमेझॉनची कार्यालयं फोडली. मनसे कार्यकर्त्यांनी पुणे, मुंबई आणि वसईमधील अॅमेझॉनच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली. ‘मराठी नाय तर अॅमेझॉन नाय’ अशी घोषणाबाजी मनसैनिकांकडून करण्यात आली.
मनसेने सुरु केलेल्या मराठी भाषेच्या मोहिमेविरोधात अॅमेझॉनने कोर्टात धाव घेतली. यानंतर दिंडोशी कोर्टाकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आली.
मराठीला प्राधान्य देण्याच्या मनसेच्या मागणीची अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस यांच्या प्रतिनिधींनी दखल घेतली होती. जेफ बेझॉस यांना तुमचा ईमेल मिळाला आहे. अॅमेझॉन अॅपबाबत तुम्हाला आलेल्या अनुभवाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. संबंधित टीमला आम्ही याची माहिती दिल्याचा ई-मेल अॅमेझॉनकडून पाठवण्यात आला होता. त्यानंतर अॅमेझॉनचं शिष्टमंडळ मुंबईत आलं होतं.