महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी पक्षाकडून वेगवेगळी रणनीती आखण्यात येत आहे. पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे देखील यामध्ये लक्ष देत आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीसाठीची अमित ठाकरे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. अमित ठाकरे यांच्याकडे मुंबईतील उत्तर पूर्व मतदार संघातील वॉर्डांची जबाबदारी असणार आहे. या दरम्यान ते एका वेगळ्या कारणामुळे सोशल मिडियावर चर्चेत आले आहेत.
खेड तालुक्यातील सावरदरी येथे मनसेच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आलेल्या अमित ठाकरे यांचा अनोखा अंदाज ग्रामस्थांना अनुभवायला मिळाला आहे. कार्यक्रम स्थळी जाण्याअगोदर ज्या ठिकाणी त्यांच्या चहापाण्याची व्यवस्था करण्यात आली होती तेथून त्यांनी बैलगाडीत बसून प्रवास केला. त्यांच्याच जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी अमित ठाकरे यांनी सावरदरी या गावाला भेट दिली.
जवळपास तीनशे ते चारशे मीटर अंतर त्यांनी बैलगाडी मध्ये प्रवास केला. विशेष म्हणजे स्वतः त्यांनी हातात कासरा पकडून बैलगाडी हाकली. यावेळी त्यांनी डोक्यावर भगवान टोपी घातली होती, तर डोळ्यावर काळा गॉगल होत. त्यांचा हा एक हटके अंदाज नागरिकांना अनुभवायला मिळाला. यावेळी त्यांच्या सोबत सेल्फी घेण्यासाठी तरुणांनी मोठी गर्दी केली होती.
त्यानंतर झालेल्या कार्यक्रम प्रसंगी राजेंद्र वागस्कर,मनोज चव्हाण,जिल्हाध्यक्ष समीर थिगळे,अझर शेख,तालुकाध्यक्ष संदीप पवार,मंगेश सावंत,सचिन चिखले,मनोज खराबी,भरत तरस,संदीप मेंगळे,मीरा कदम,नीता शेटे,ताराबाई शेटे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष संदीप पवार यांनी केले.