दौंड येथील भीमा नदी पात्रातील २८ मोऱ्यांच्या रेल्वे पूलाजवळ एक अनोखी घटना घडली आहे. शंकराचे मुख असलेली जवळपास १५० वर्षांपूर्वीची दगडी मूर्ती खोदकाम करतांना सापडली आहे. या शंकराच्या मूर्तीचे तोंड जवळपास पाच फुट असून वजन एक टनाच्या आसपास आहे. दौंड-नगर रेल्वे मार्गासाठी गेल्या १५० वर्षांपूर्वी इंग्रजांनी दगडी कामातील पूल उभा केला होता. या पूलाच्या बाजूला दुसऱ्या रेल्वे पूलाच्या पायाभरणीचे काम आता सुरु आहे.
या ठिकाणी शनिवारी खोदकाम सुरू होते त्यावेळी एका खड्यात ही मूर्ती सापडली. कामागारांनी ही मूर्ती जेसीबीच्या सहाय्याने बाजूला काढून ठेवली. तेथील लोकांच्या मते हि मूर्ती पाण्याच्या प्रवाहाने वाहून आली आहे. परंतु ही मूर्ती जास्त वजनाची असल्याने पाण्यात वाहून येऊ शकत नाही असा अंदाज आहे. या मूर्तीचा तेथे भाग सापडल्याने त्याचे अवशेषही सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही पुरातनकालीन मूर्ती या ठिकाणचीच असण्याची शक्यता आहे.