राष्ट्रवादीच्या अजून एका आमदाराची ऑफर; ग्रामपंचायत बिनविरोध करा आणि गावच्या विकासासाठी घ्या ११ लाख

129

गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक टाळून, ग्रामपंचायत बिनविरोध केल्यास ११ लाखांचा निधी देऊ अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळमधील आमदार सुनील शेळके यांनी केली आहे. निवडणुका बिनविरोध होण्यास प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी ‘माझं गाव, माझा स्वाभिमान’ अभियान हाती घेतले आहे. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा, ११ लाखांचा निधी मिळवा, असे आवाहन त्यांनी केले.

आमदार सुनील शेळके यांच्या मतदारसंघातील मावळ तालुक्यातील 57 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या काळात मतदारयाद्यांमध्ये नाव लावण्यापासून संघर्षाला सुरुवात होते. अनेकदा वाद होतात. काहीजण नाव नोंदणीसाठी दबावतंत्राचा वापर करतात. त्यावर नंतरच्या काळात कारवाई देखील होते. हे प्रकार टाळण्यासाठी ‘माझं गाव माझा स्वाभिमान’ हे अभियान राबवले जात असल्याची माहिती आमदार शेळके यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, याआधी ग्रामपंचायत बिनविरोध निवडून दिल्यास, आमदार निधीतून त्या गावाला 25 लाख रुपये देण्याचा निर्णय पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी घेतला आहे. ग्रामपंचायत बिनविरोध निवडणूकिमुळे गावचा संघर्ष कमी होईल, आणि गावचा विकास यातून साधता येईल, असे आमदार लंके म्हणाले होते.