संपूर्ण देशभरात कोरोनाच्या संसर्गाचा धोका अधिक वाढला आहे. त्यात कोरोनाला हरवण्यासाठी लसीकरण युद्ध पातळीवर सुरु करण्यात आले आहे. मात्र आज अनेक राज्यांमध्ये मोठया प्रमाणात लसीचा तुटवडा जाणवू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर आता एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आज दुपारी सुमारे चारच्या सुमारास रशियाच्या विमानातून SputnikV ची पहिली खेप भारतात पोहोचली आहे.
काही दिवसांपूर्वी केंद्रानं रशियाच्या SputnikV या लसीच्या आपात्कालिन वापरासाठी मान्यता दिली होती. तसेच आजपासूनच देशात १८ ते ४५ या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरवात होणार आहे. SputnikV भारतात पोहोचल्यानं या मोहीमेला अधिक गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी भारतानं SputnikV या लसीच्या आपात्कालिन वापरासाठी मंजुरी दिली होती.
देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण रुग्णालयांमध्ये दाखल होत आहेत. त्यामुळे एकूणच आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. दरम्यान, देशात लसीकरण मोहिमही जोरात सुरु आहे. कोरोनाचा हा कहर नियंत्रणात यावा यासाठी जास्तीत जास्त वेगानं लसीकरण होणं गरजेचं आहे. यामध्ये जास्तीत जास्त लोकांना लस दिली गेल्यास संसर्गाचे प्रमाण घटण्यास मदत होऊ शकते.