आनंदवनाच्या सीइओ डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या

18

आनंदवनाच्या सीइओ डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केली आहे. डॉ. शीतल या आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. तसंच, शीतल आमटे काही दिवसांपासून मानसिक तणावात होत्या त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असल्याचं बोललं जात आहे. शीतल यांनी विषारी इंजेक्शन टोचून घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

डॉ. आमटे यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुक लाइव्ह करून आनंदवानातील महारोगी सेवा समितीच्या कामाबद्दल, विश्वस्तांबद्दल आणि कार्यकर्त्यांबद्दल गंभीर आरोप केले होते. त्यानंतर दोन तासात हे फेसबुक लाइव्ह डिलीट करण्यात आलं होतं. डॉ. शीतल आमटे यांच्या या फेसबुक लाइव्हनंतर अनेक चर्चांना तोंड फुटलं होतं.

डॉ. शीतल आमटे ह्या विकास आणि भारती आमटे यांच्या कन्या होत्या. आमटे कुटुंबीयांचा समाजसेवेचा वारसा त्यांनीही जोपासला. २००३ मध्ये नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचं त्यांनी शिक्षण घेतलं होतं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आनंदवनातच काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. शीतल आमटे या अपंगत्व विशेषज्ज्ञ म्हणूनही प्रसिद्ध होत्या. त्यांच्या आत्महत्येने सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.