मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी जिल्ह्यात आले होते. त्यांनी नुकसानीची पाहणी करून आढावाही घेतला. मात्र, कोणतेही आश्वासन न देता ते पुन्हा मुंबईत गेले. त्यामुळे विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली होती.
या पार्श्वभूमीवर पालकमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत विरोधकांना उत्तर दिले. मंत्री सामंत म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्याएवढेच नुकसान रत्नागिरी जिल्ह्याचेही झाले आहे. जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत. पंचनाम्यानुसार संबंधितांना लवकरच योग्य तो मोबदला देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
तसेच उद्यापर्यंत सर्व पंचनामे पूर्ण होतील आणि दोन दिवसांत मुख्यमंत्री स्वत: योग्यप्रकारे मदत जाहीर करतील, असा ठाम विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.
विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर सारखे सारखे आरोप केले, तरी त्यांची प्रतिमा मलीन होणार नाही. उलट ते राज्यातील जनतेच्या हृदयात आहेत, असा टोलाही मंत्री सामंत यांनी विरोधकांना लगावला