मराठा समाजाला मिळालेले आरक्षण हे सध्या न्यायप्रविष्ट असले तरी पूर्वी या समाजास आरक्षण मिळत होते.मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रविष्ट असून १५ मार्च २०२१ पासून यावर अंतिम सुनावणी सुरू होणार आहे, या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजेंनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.
स्वातंत्र्यानंतर सन १९६७ सालापर्यंत ‘इंटरमिडीयट कम्युनिटी क्लास’ या प्रवर्गाअंतर्गत मराठा समाजास आरक्षणाचा लाभ मिळत होता. मात्र १९६८ साली मराठा समाजास या प्रवर्गातून वगळण्यात आले व तेव्हापासून हा समाज आरक्षणापासून वंचित आहे, असल्याचे छत्रपती संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
मराठा समाज हा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचे नोंदविण्यात आले आहे. हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले असता राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल मान्य करीत मराठा आरक्षण वैध ठरविले व मराठा समाज सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास असल्याचे म्हटल्याचे संभाजीराजेंनी पत्रात म्हटले आहे.
राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करतो, त्यामुळे हा संपूर्ण अहवाल त्याच्या आवश्यक सहपत्रासह सर्वोच्च न्यायालयाला अभ्यासण्यासाठी इंग्रजीमध्ये भाषांतरीत करावा, अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे.
१०२ व्या घटना दुरुस्ती मुळे राज्यांचे अधिकार जात नाहीत, याबाबतचे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर करावे, अशी विनंती राज्य सरकारने केंद्र सरकारला करावी, असे संभाजीराजेंनी म्हटले आहे.
राज्यशासनाने पुढील सुनावणीमध्ये कोणत्याही प्रकारचा वेळकाढूपणा न करता, अत्यंत मुद्देसूद व अभ्यासपूर्ण मांडणी करून मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीवरील स्थगिती उठविण्यासाठी कटीबद्ध राहावे, असेही त्यांनी म्हटले आहे.