ग्रामपंचायत बिनविरोध निवडून दिल्यास, आमदार निधीतून त्या गावाला 25 लाख रुपये देण्याचा निर्णय पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी घेतला आहे. ग्रामपंचायत बिनविरोध निवडणूकिमुळे गावचा संघर्ष कमी होईल, आणि गावचा विकास यातून साधता येईल, असे आमदार लंके म्हणाले होते. त्याला आता मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. महाराष्ट्राला सुपरिचित असलेल्या राळेगणसिद्धी ग्रामपंचायतने निवडणूक बिनविरोध घेण्याचा निर्णय घेतला आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची कर्मभुमी असलेल्या राळेगणसिद्धीच्या ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय नुकताच झाला आहे. आ.नीलेश लंके यांच्यासह गावातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या सुपे येथे पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
आ.लंके यांच्या निवडणूक बिनविरोध करण्याच्या आवाहनाचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे तसेच आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनीही स्वागत केले होते. या निर्णयामुळे गावामधील भांडणे थांबतील व गावाच्या विकासाची घोडदौड सुरू होईल असे मत हजारे व पवार यांनी व्यक्त केले होते.
दरम्यान, बिनविरोध निवडणूकांचा उपक्रम महत्वाचा असून ग्रामपंचायतींच्या बिनविरोध निवडणूकांसाठी आमदार निलेश लंके यांचा प्रचारक म्हणून मी काम करणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शनिवारी राळेगणसिद्धी येथे बोलताना जाहिर केले.