अण्णा हजारेंनी केलं ‘या’ राष्ट्रवादीच्या आमदाराचे कौतुक

450

राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजत, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. 15 जानेवारीला मतदान होत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत पैशांचा मोठा सुळसुळाट ग्रामपंचायत पाहायला मिळतो. त्यातून दारू, मटण अशी मतदारांना आकर्षित करणाऱ्या गोष्टींचं वाटप मोठ्या प्रमाणात होतं. गावात अनेक वाद उद्भवत असतात.

यावर महाराष्ट्रातील एका आमदाराने नामी उपाय शोधत गावकऱ्यांना मोठी ऑफर दिली आहे. गावची ग्रामपंचायत बिनविरोध निवडून दिल्यास, आमदार निधीतून त्या गावाला 25 लाख रुपये देण्याचा निर्णय पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी घेतला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमुळे प्रशासनावर मोठा ताण पडतो. तसेच निवडणुकीला मोठा खर्च होतो. याला आळा बसवण्यासाठी बिनविरोध निवडणूक होणे गरजेचे असल्याचे मत आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केले. गावचा संघर्ष यामुळे कमी होईल, आणि गावचा विकास यातून साधता येईल, असे आमदार लंके म्हणाले.

दरम्यान, आमदार नीलेश लंके यांनी हाती घेतलेला हा विषय अतिशय चांगला आहे. अलिकडेच त्यांची आणि माझी भेट झाली. त्यावेळी त्यांनी माझ्या कानावर हा विषय घातला होता. ग्रामपंंचायतीच्या निवडणूकांमध्ये गटातटांमध्ये भांडणे होतात. सामाजिक तेढ निर्माण होतो. राजकिय गट निर्माण होतात. राजकिय साठमारीत गावाचा विकास खुंटतो. बिनविरोध निवडणूका झाल्यास गावामधील भांडणे मिटतील, गावाच्या विकासाला चालना मिळेल असे सांगून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आमदार नीलेश लंके यांनी हाती घेतलेल्या कामासाठी शुभेच्छा दिल्या.