देशाची राजधानी दिल्लीच्या सीमेवर मागील दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. कृषि कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना आता अण्णा हजारे यांनी सरकारविरोधात ३० जानेवारीपासून आमरण उपोषण करणार आहेत. ३० जानेवारीपासून येथील यादव बाबा मंदिरात उपोषण करणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गुरुवारी सायंकाळी स्पष्ट केले आहे.
2018 पासून अण्णा हजारे स्वामीनाथन आयोगाच्या सिफारशी लागू करण्यासाठी केंद्र सरकारकडे विनंती करत आहेत. परंतु त्यांच्या विनंतीकडे लक्ष दिलं जात नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सरकारच्या या वृत्तीवर नाराज होऊन त्यांनी 30 जानेवारीपासून आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
अण्णा हजारे म्हणाले, “वारंवार आम्ही सरकारकडे आमच्या मागण्या मांडल्या आहेत. गेल्या तीन महिन्यांत पंतप्रधान आणि कृषी मंत्र्यांना मी पाच वेळा पत्र लिहिलं. सरकारचे प्रतिनिधी इथे येऊन चर्चा करत आहेत. मात्र, अद्याप या मागण्यांवर कोणताही योग्य तोडगा निघू शकलेला नाही.
सर्व कार्यकर्त्यांना माझी नम्र विनंती आहे की केवळ मी राळेगणसिद्धी येथून उपोषण करेन तर जे मला समर्थन देऊ इच्छितात त्यांनी आपल्या गावातून, जिल्हाधिकारी कार्यालयावर शांततेत आंदोलन करावे. अद्यापही करोनाचा धोका टळलेला नाही त्यामुळे राळेगणसिद्धी येथे गर्दी करणे योग्य ठरणार नाही” अशी विनंतीही अण्णा हजारे यांनी कार्यकर्त्यांना केली आहे.