राज्यातील बारा बलुतेदारांना स्वतंत्र पॅकेज जाहीर करा; भाजप ओबीसी मोर्चाची मागणी

20

कोरोनासह लॉकडाऊनच्या या काळात आर्थिकदृष्ट्या पूर्णतः अडचणीत सापडलेल्या बारा बलुतेदारांना राज्य सरकारने स्वतंत्र आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाने परभणीत एका निवेदनाद्वारे केली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना जिल्हाधिकार्‍यांमार्फत पाठविलेल्या या निवेदनातून राज्यातील बारा बलुतेदार आर्थिकदृष्ट्या पूर्णतः कोलमडले आहेत, असे निदर्शनास आणून दिले. न्हावी, सुतार, कुंभार, शिंपी, परीट इत्यादी बारा बलुतेदारांमधील छोट्या जातीतील परंपरागत व्यवसाय लॉकडाऊनमुळे पूर्णतः बंद आहेत. त्यामुळे आधीच आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणार्‍या या घटकांना लॉकडाऊनमुळे मोठा तडाखा बसला आहे.

एकप्रकारे या बारा बलुतेदारांवर उपासमारीची वेळ आली असून राज्य सरकारने ऑटोरिक्षा चालक, बांधकाम मजूर, फेरीवाले इत्यादींप्रमाणे न्हावी, सुतार, शिंपी, कुंभार, परीट आदी बारा बलुतेदारांसाठी पाच हजार रुपयांचे अर्थसहाय्य करावे, अशी अपेक्षा ओबीसी मोर्चाचे प्रदेश चिटणीस रामकिशन रौंदळे, प्रदेश चिटणीस प्रदीप तांदळे, महानगर जिल्हाध्यक्ष भालचंद्र गोरे, मोर्चाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष भागवतराव बाजगीर यांनी व्यक्त केली आहे.

जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांना बेड उलब्ध होत नाही. कोविड सेंटर तालुकास्थानी सुरु करुन कोरोना रुग्णांची व्यवस्था व उपचार कसे चांगल्या पध्दतीने होईल, या दृष्टीने शासनस्तरावर प्रयत्न करावे, अशी अपेक्षा चिटणीस, रौंदळे यांनी व्यक्त केली.