राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील महत्वाचा भाग असणार्या बजेटच्या सत्रास सुरुवात झाली आहे. कोरोनामुळे आरोग्यव्यवस्थेची झालेली दाणादाण बघता बजेटमध्ये आरोग्य क्षेत्रासाठी महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ७ जिल्ह्यांमध्ये नविन वैद्यकीय महाविद्यालयांची घोषणा अर्थमंत्री तथा ऊपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडून करण्यात आली आहे.
कोरोनाकाळात सर्वात जास्त कस आरोग्यव्यवस्थेचा लागला होता. तसेच कोरोनामुळेच आरोग्य क्षेत्रातील ऊणिवांचे दर्शनसुद्धा आपल्याला झाले होते. बजेटमध्ये आरोग्यक्षेत्राला काय मिळते याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेलेच होते. त्यातच अर्थमंत्री अजित पवार यांनी ही महत्वाची घोषणा केली आहे. तसेच पुण्यातील ससुण रुग्णालयातील वर्ग क्रं. ४ च्या कर्मचार्यांसाठीसुद्धा महत्वाची घोषणा केली आहे.
परभणी, अमरावती, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, नाशिक, रायगड आणि सातारा या सात जिल्ह्यांमध्ये नविन वैद्यकीय महाविद्याले स्थापन करण्यात येणार आहे. ज्यामुळे पदवीस्तरावरील १९९० तर पदव्युत्तर स्तरावर १००० जागा वाढणार असल्याचं अजित पवार म्हणाले. पुणे येथील ससुण रुग्णालयातील वर्ग क्र.४ च्या कर्मचार्यांच्या निवासस्थानाचा प्रश्न ऊपस्थित झाला होता. निवासस्थानाच्या बांधकामासाठी २८ कोटी २२ लाख रु. अंदाजित खर्चाची घोषणा करण्यात आली आहे.
आरोग्य आयुक्तालयाच्या अधिपत्याखाली नागरी आरोग्य संचालक कार्यालयाची निर्मिती करण्याची घोषणा अजित पवारांनी केली आहे. शहरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळावी याकरिता हे कार्यालय कार्य करणार आहे. महानगर पालिका, नगरपरिषदा, नगरपंचायतींमध्ये दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी येत्या ५ वर्षांत ५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून त्यातले ८०० कोटी या वर्षी उपलब्ध करून देण्यात येतील, असेही ते यावेळी म्हणाले.