मुंबई पोलिसांचा अर्णबवर आणखी एक आरोप

10

टीआरपी घोटाळ्याचा तपास अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. त्यामुळे तपासात अडथळा निर्माण करण्याचे काम होत आहे. रिपब्लिक टीव्ही आणि रिपब्लिक भारत या वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून मुंबई पोलिस दलाविषयी अपप्रचार करून आणि याचिका करून सातत्याने तपासात अडथळा निर्माण करण्याचे काम अर्णब गोस्वामी आणि एआरजी कंपनी करीत असल्याचा आरोप मुंबई पोलिसांकडून करण्यात आला आहे.

टीआरपी प्रकरणातील तपासात आतापर्यंत वाहिन्यांचा टीआरपी कृत्रिमरीत्या वाढवण्यासाठी बार्कमधील अधिकाऱ्यांनी काहींशी संगनमत केल्याचे उघड झाले आहे. अशावेळी एआरजी कंपनी आणि अर्णव गोस्वामी हे या प्रकरणांत संबंद्धित असल्याचा आरोप मुंबई पोलिसांनी आपल्या प्रतिज्ञापत्राद्वारे मुंबई उच्च न्यायालयात केला आहे. तसेच गोस्वामी व कंपनीची याचिका त्यांना दंड लावून फेटाळावी, अशी विनंतीही पोलिसांनी केली आहे.

घोटाळ्याचा तपास केवळ आम्हाला लक्ष्य करण्यासाठी केला जात अाहे असा आरोप एआरजी आऊटलायर कंपनी आणि या कंपनीच्या रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांनी केली आहे. तसेच हा तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडे द्यावा, अशा विनंतीसुद्धा त्यांनी केली आहे.
‘या प्रकरणाच्या तपासादरम्यान व्हॉट्सअॅपवरील संभाषण हाती लागले आहेत. त्यातून काही आरोपींविरोधात दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटल्याप्रमाणे जो टीआरपी घोटाळा झाला आहे त्याचा तपास आणखी सुरू राहण्याची आवश्यकता स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे कंपनीच्या या याचिकेच्या माध्यमातून तो तपास थांबू नये. मुंबई पोलिसांच्यावतीने कोर्टाकडे अशी विनंती करण्यात आली आहे.

सोबतच या प्रकरणात याचिकादार कंपनीकडून आपल्या वृत्तवाहिन्यांचा वापर हा केवळ मुंबई पोलिस दलाविरोधात सूड उगवण्यासाठी होत आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू व पालघर झुंड बळी यांचा काहीच संबंध नसताना तो जोडून जाणीवपूर्वक हा तपास राजकीय हेतूने असल्याचे याचिकादारांकडून वारंवार दाखवले जात आहे. उघडपणे मीडिया ट्रायल करून आणि या प्रकरणात स्वत:च्याच कंपनीला क्लीन चीट देऊन मुंबई पोलिस दलाची बदनामी करण्याचे उद्योग याचिकादार करत आहेत. यामुळे निष्पक्ष तपासातच अडथळे निर्माण करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहेत’, असे म्हणणे मुंबई पोलिसांनी यावेळी मांडले आहे.