मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने राज ठाकरे यांची नुकतीच पक्षातील महत्वाच्या नेत्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईतील लोकसभा मतदारसंघाप्रमाणे समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी शिवसेनेत प्रवेश करून २४ तास उलटण्याआधीच ज्येष्ठ नगरसेवक मंदार हळबे यांनी भाजपामध्ये प्रवेश करत मनसेला खिंडार पाडलं. यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महत्वाचा निर्णय घेतला असून लोकसभा मतदारसंघाप्रमाणे समिती स्थापन करा असे आदेश राज ठाकरेंनी दिले आहेत.
राजेश कदम यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देताच २४ तासांच्या आत राज ठाकरे यांनी आपल्या या बालेकिल्ल्यासाठी नव्या शेलेदाराची नेमणूकही केली. मनोज घरत यांची आता डोंबिवलीच्या शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी एबीपी माझाशी बोलताना माहिती दिली. विशेष म्हणजे अमित ठाकरे यांच्यावरही मोठी जबाबदारी देण्यात आली असून मुंबईतील उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघ त्यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. अमित ठाकरे यांच्यासोबत संदीप देशपांडे यांच्यावर उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आहे.