परभणी शहरातील साखला प्लॉट भागात आज पहाटे एका व्यक्तीने आपल्या पत्नीवर किरकोळ कारणातून कैचीने सपासप वार करीत जबर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
साखला प्लॉट भागातील कैलास गवारे व अनिता गवारे या पती-पत्नीत रविवारी रात्री उशीरा कौटुंबिक किरकोळ कारणातून भांडणं झाली. त्यातून हे दोघे रात्री उशीरापर्यंत जागे होते. पत्नी अनिता गवारे यांनी पतीस ‘तुम्ही का झोपत नाहीत’, असे म्हटले तेंव्हा पती कैलास गवारे याने रागाच्या भारात दोरीने पत्नीच्या गळ्याभोवती फास आवळला.
त्यातून त्या कसबशी स्वतःची सुटका करत दरवाजाकडे पळाल्या तेंव्हा त्याने शिलाई मशीनवरील कैची उचलून पोटावर, छातीवर, मांडीवर सपासप वार केले. मोठा आरडाओरडा सुरु झाल्यानंतर आसपासच्या लोकांनी जखमी अनिता यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, या प्रकरणात अनिता गवारे यांनी पती कैलास गवारे यांच्याविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सदरील गुन्ह्यात पोलिस तपास करीत आहेत.