गेल्या अनेक दिवसांपासून बहूचर्चित असणार्या टीआरपी घोटाळ्यातील मुख्य आरोपी अर्णब गोस्वामी व संबंद्धित कंपनी यांना दिलासा मिळाला आहे. १२ फेब्रुवारीपर्यंत प्रकरणातील संबंद्धित कुणावरही अटकेसारखी कठोर कारवाई करण्यात येणार नाही, अशी हमी मुंबई पोलिसांतर्फे शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली.
मागील काही दिवसांपासून टीआरपी घोटाळा हा चर्चेचा विषय आहे. नवनविन खुलासे या प्रकरणात होत आहे. याप्रकरणी काही महत्वाच्या व्यक्तींना मुंबई पोलिसांनी अटकसुद्धा केली आहे. आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. न्या. संभाजी शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठापुढे याप्रकरणी सुनावणी सुरु आहे. १२ फेबृवारी ही पुढील सुनावणीची तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे १२ तारखेपर्यंत आम्ही कुणालाही अटक करणार नाही अशी हमी मुंबई पोलिसांनी यावेळी दिली. पुढील सुनावणी १२ फेबृवारीला असल्यामुळे याचिकादार कंपनीने तसेच संबंधित सर्व पक्षकारांनी आपापले कायदेशीर म्हणणे लेखी स्वरुपात ९ फेब्रुवारीपर्यंत मांडून पूर्ण करावी, असे निर्देश खंडपिठाने दिले आहे.
‘या प्रकरणात कंपनी व अन्य प्रतिवादींकडून वारंवार व ऐनवेळी वेगवेगळे अर्ज, प्रतिज्ञापत्रे दाखल केली जात असल्याने सुनावणी पुढे जात आहे आणि कागदपत्रांची संख्या तब्बल आठ हजारांच्या घरात गेली आहे. असेच सुरू राहिले तर याविषयी सुनावणी सुरू होऊन संपायला काही महिने लागतील. त्यामुळे आता सर्वांचे कायदेशीर म्हणणे लेखी स्वरूपात एका विशिष्ट तारखेपर्यंतच सादर होणे आवश्यक आहे’, असे खंडपीठाने शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या सुनावणीच्या वेळी निदर्शनास आणले.
कंपनीतर्फे भूमिका मांडणार्या अॅड. मालविका त्रिवेदी यांनी आम्हाला अधिक वेळेची आवश्यकता आहे त्यामुळे पुढील सुनावणी २६ फेबृवारीला ठेवण्यात यावी अशी विनंती केली. मात्र, ‘न्यायालयातील ही याचिका आणि त्यात दिलेल्या हमीमुळे पोलिसांना याचिकादारांविरोधात कारवाई करणे शक्य होत नसून ही हमी अधिक काळ कायम ठेवता येऊ शकणार नाही. त्यामुळे १२ फेब्रुवारीला पुढील सुनावणी ठेवावी’, अशी विनंती सिब्बल यांनी केली. अखेरीस ‘पोलिसांना आपल्या हमीची मुदत वारंवार वाढवावी लागत आहे. हे असेच सुरू ठेवता येणार नाही. त्यामुळे ९ फेब्रुवारीपर्यंत सर्वच पक्षकारांनी आपापले कायदेशीर म्हणणे लेखी स्वरूपात सादर करावे. जेणेकरून सुनावणी सुरू होऊ शकेल’, असे खंडपीठाने आदेशात स्पष्ट केले आणि पुढील सुनावणी १२ फेब्रुवारीला ठेवली.