वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे खासगी रुग्णालयात बेडची व्यवस्था करा; सर्वपक्षीय नेतेमंडळींची मागणी

11

परभणी जिल्ह्यातील सेलू शहरासह तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढू लागल्याने प्रशासनाने खासगी रुग्णालयातही बेडची व्यवस्था करावी, आवश्यक त्या ठिकाणी व्हेंटिलेटरचा उपयोग करावा, अशी मागणी सर्वपक्षीय नेतेमंडळींनी सेलूच्या उपजिल्हाधिकार्‍यांमार्फत जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे केली आहे.

काँग्रेसचे शहराध्यक्ष विनोद तर्टे, माजी नगरसेवक मिलींद सावंत, अमजदभाई बागवान, शिवसेनेचे शहर प्रमुख मनिष कदम, एमआयएमचे इसाक पटेल आदींनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की शहरात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

दररोज कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या ठिकाणी फिजीशियनसह अनेस्तेशिस्ट उपलब्ध करून द्यावेत. उपजिल्हा रुग्णालयात आठ व्हेंटीलेटर उपलब्ध आहेत. मात्र, त्यांचा उपयोग केला जात नसल्याचा आरोपही या नेतेमंडळींनी केला आहे.

रेमडीसिव्हीर इंजेक्शनचा मुबलक साठा उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे. निवेदनावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंचाचे अध्यक्ष मिलिंद सावंत, शिवसेनेचे शहरप्रमुख मनीष कदम, काँग्रेसचे शहराध्यक्ष विनोद तरटे, एमआयएमचे तालुकाध्यक्ष इसाक पटेल व सामाजिक कार्यकर्ते अमजद भाई बागवान आदींच्या सह्या आहेत.