माधव भांडारी
देवेंद्रजींना विकासाची दृष्टी, जाण जबरदस्त म्हणावी अशी आहे. त्यांची भविष्यवेधी नजर जर बघायची असली, तर ‘ईझ ऑफ डुइंग बिझनेस‘कडे पाहावे लागेल. आता ही कल्पना डोक्यामध्ये आणणे आणि त्याप्रमाणे आपल्या राज्यातले कायदे-नियम बदलणे हे त्यांना सुचले आणि त्यांनी ते करून दाखवले.
१९६०मध्ये महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर आजवरच्या मुख्यमंत्र्यांमध्ये देवेंद्र फडणवीस हे नाव अनेक अर्थांनी वेगळे ठरणारे आहे. अफाट आकलनक्षमता, भविष्याचा वेध घेणारी दृष्टी, प्रचंड अभ्यासू वृत्ती, मेहनती स्वभाव आणि मुख्य म्हणजे राजकारणी व्यक्तिमत्त्वाच्या रूढ चौकटी मोडून स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची क्षमता अशी देवेंद्रजींच्या व्यक्तिमत्त्वाची काही ठळक वैशिष्ट्ये सांगता येतील.
म्हणूनच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत देवेंद्र गंगाधरराव फडणवीस हे नाव ठसठशीतपणे समोर येते. महाराष्ट्रातील जातीपातीची वर्षानुवर्षे रूढ झालेली समीकरणे पाहता देवेंद्रजी हे मुख्यमंत्री म्हणून कितपत यशस्वी ठरतील, अशी शंका अनेकांच्या मनात होती. मात्र देवेंद्रजींनी ही शंका खोटी तर ठरवलीच, त्यापलीकडे जाऊन अनेक लोकोपयोगी, भविष्याचा वेध घेऊन घेतलेल्या निर्णयांतून महाराष्ट्राच्या प्रगतीची वाट द्रुतगती मार्गात रूपांतरित करण्याचे काम देवेंद्रजींनी केले. प्रामाणिक, निष्कलंक, भविष्यातील विकासाचा वेध घेणारे पारदर्शक व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांनी आपल्या ठसा उमटवला. त्यांच्या काळामध्ये राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप कुणी करू शकले नाही, ही त्यांची कामाची खरी पावती आहे. देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेत असताना जातीय तेढ निर्माण करणारे अनेक प्रसंग घडले. पण त्यांनी प्रत्येक वेळी धीरगंभीरपणे आणि मुत्सद्दीपणे त्याला उत्तर दिले. कोपर्डी, भीमा कोरेगाव प्रकरणात संपूर्ण महाराष्ट्रात दंग्यांचा वणवा पेटेल अशी स्थिती असताना त्यांनी अत्यंत खंबीरपणे व धोरणीपणे परिस्थिती हाताळली. महाराष्ट्राला त्याचा त्रास होऊ दिला नाही आणि त्यातून रस्ता काढला. शेतकरी कर्जमाफीची आंदोलने असो की मराठा, धनगर आरक्षणाचे आंदोलन असो, या प्रत्येक आंदोलनातून प्रसारमाध्यमांमधून देवेंद्रजींच्या व सरकारच्या विरोधात वातावरण तयार केले गेले. पण त्या सगळ्या विषयात देवेंद्रजींची भूमिका अत्यंत स्थिर असे. ते गांगरून गेल्याचे मी पाच वर्षांत एकदाही पाहिलेले नाही. संकट कसले असले, तरीही आपण यातून सुखरूप बाहेर पडू, असा विश्वास मला त्यांच्या देहबोलीतून नेहमीच जाणवत होता.
देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणाचा विषय राज्यात चांगला तापला होता. मराठा समाजाने राज्यभर काढलेल्या मोर्चांमुळे वातावरण ढवळून निघाले होते. या कठीण परिस्थितीतही देवेंद्रजींनी अत्यंत शांतपणे परिस्थितीन हाताळली व अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. ह्या काळात काही मंडळींकडून समाजमाध्यमांतून देवेंद्रजींवर अत्यंत गलिच्छ व शिवराळ भाषेत टीकेची झोड उठवणे चालू होते. मात्र देवेंद्रजी विचलित झाले नाहीत. आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत त्यांनी मराठा समाजाला वेगवेगळ्या सोयी-सवलती दिल्या. अन्य मागासवर्गीय समाजाच्या (ओबीसी) सवलती मराठा समाजाला देणे, मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे चालू करणे यासारखे निर्णय देवेंद्रजींनी तातडीने घेतले. मराठा विद्यार्थ्यांची निम्मी फी भरणे, १० लाखांपर्यंतचे शैक्षणिक कर्ज माफ करणे यासारखे निर्णय घेणे सोपे नव्हते, याचे कारण या निर्णयांमुळे सरकारी तिजोरीवर मोठा भार पडणार होता. मात्र असे निर्णय घेताना देवेंद्रजी कचरले नाहीत. धडाडीने निर्णय घेणे हे देवेंद्रजींच्या कार्यपद्धतीचे मोठे वैशिष्ट्य आहे.
मराठा आरक्षणाचा निर्णय जाहीर केल्यानंतर वैद्यकीय अभ्याक्रमासाठी आरक्षण लागू होणार नाही, असा निकाल न्यायालयाने दिल्याने मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी पुन्हा सरकारविरुद्ध आंदोलनाची भाषा सुरू केली. या स्थितीत मराठा विद्यार्थ्यांनी खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घ्यावा, त्यांच्या शैक्षणिक शुल्काचा भार सरकार उचलेल असा प्रस्ताव देवेंद्रजींपुढे मांडला गेला. सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात जेवढे शुल्क भरावे लागते तेवढे शुल्क मराठा विद्यार्थ्यांनी भरावे, उर्वरित शुल्क सरकार भरेल, असा निर्णय देवेंद्रजींनी घेतला. यासाठी सरकारला २८ कोटींची तरतूद करावी लागणार आहे. ही आकडेवारी तयार झाल्यावर त्यासाठीच्या तरतुदीस देवेंद्रजींनी तातडीने मान्यता दिली. मराठा विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय प्रवेशाबाबत राज्य सरकारने वटहुकूम काढला. मराठा विद्यार्थ्यांसाठी जो निर्णय घेतला, तोच निर्णय खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांना लागू करण्याचा निर्णय देवेंद्रजींनी घेतला. असे निर्णय घेणे सोपे नसते, कारण यासाठी काहीशे कोटींची तरतूद करावी लागणार होती. न्यायालयाच्या निर्णयाकडे बोट दाखवत सरकार स्वस्थ बसून राहू शकले असते. मात्र देवेंद्रजींमधील सहृदय माणूस त्यांना असे निर्णय घेण्यास प्रवृत्त करतो.
मुख्यमंत्री असताना आपल्या सर्व सहकार्यांना विश्वासात घेत, त्यांना आदर देत ते मंत्रीमंडळाचे कामकाज करत. त्यामुळे सर्वांना एकत्र काम केल्याचा मोठा आनंद अनुभवता आला. मला पुनर्वसन प्राधिकरणाचा उपाध्यक्ष म्हणून काम करताना व त्याही पूर्वी प्रकल्पग्रस्तांचे तसेच अन्य प्रश्न मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्रजींकडे घेऊन गेल्यावर त्यांच्या आकलनशक्तीचा, वेगाने निर्णय घेण्याच्या कार्यशैलीचा अनेकदा अनुभव आला. आम्ही राज्याच्या विकासासंदर्भात एखादा नवा विचार, नवी कल्पना घेऊन देवेंद्रजींकडे घेऊन गेलो तर ते आमचे काय म्हणणे आहे हे शांतपणे ऐकून घेत. आमचे म्हणणे समजून घेत. कर्णधार आपल्यावर विश्वास टाकतो आहे, आपल्या कल्पनांचा आदर करतो आहे हे लक्षात आल्यावर सहकार्यांचा कर्णधाराबाबतचा आदर आपसूक वाढतो. त्याचबरोबर आपल्या सहकार्यांवर विश्वास टाकून त्यांच्यावर महत्त्वाच्या जबाबदार्या सोपवण्याचा देवेंद्रजींचा स्वभाव मला नेहमीच भावत आला आहे. मी मुख्यमंत्री आहे, म्हणजे मला सर्व विषयातले सर्व काही समजते अशी वृत्ती देवेंद्रजींनी कधीच बाळगली नाही. एखाद्या विषयाबाबत माहिती नसेल तर ते मोकळेपणाने मला याची माहिती नाही, असे सांगतात. स्वभावतला हा मोकळेपणा देवेंद्रजींबद्दलचा आदर वाढवणारा ठरला आहे.
देवेंद्रजींना विकासाची दृष्टी, जाण जबरदस्त म्हणावी अशी आहे. त्यांची भविष्यवेधी नजर जर बघायची असली, तर ‘ईझ ऑफ डुइंग बिझनेस‘कडे पाहावे लागेल. आता ही कल्पना डोक्यामध्ये आणणे आणि त्याप्रमाणे आपल्या राज्यातले कायदे-नियम बदलणे हे त्यांना सुचले आणि त्यांनी ते करून दाखवले. मेक इन इंडियाच्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळ्या परवानग्यांची यादी कमी करणे, तसेच सांस्कृतिक विभागामार्फत चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी ऑनलाइन एक खिडकी योजना राबवणे (एका ठिकाणी अर्ज दिला तर तुम्हाला पंधरा दिवसांनी परवानगी मिळेल.) हा जो त्यांचा दृष्टीकोन आहे, त्यामुळे सामान्य माणसामागचा त्रास कमी होणार आहे. पंतप्रधान मोदीजी नेहमी म्हणतात, ‘मिनिमम गव्हर्मेंट मॅक्झिमम गव्हर्नन्स‘. याचा अर्थ लायसन्स राज, परवाना राज या कटकटीतून सामान्य माणसाला बाहेर काढणे. देवेंद्रजीं मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक गोष्टींतून हे साध्य करून दाखवले. देवेंद्रजींचे व्यक्तिमत्त्व अत्यंत संवेदनशील आहे. राज्य सरकारच्या अनेक निर्णयांतून देवेंद्रजींनी या संवेदनशीलतेचा प्रत्यय दिला आहे. अनाथांना आरक्षण देण्याचा निर्णय हा त्यांच्यातील संवदेनशीलतेचे दर्शन घडवणारा आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या १५ वर्षांच्या राजवटीत शेतकर्यांच्या आत्महत्या प्रचंड प्रमाणात वाढल्या होत्या. हे प्रमाण कमी करण्यासाठी त्यांनी निर्धाराने पावले टाकली. शेतकर्यांना प्रशिक्षित करण्याबरोबरच मराठवाड्यातील, विदर्भातील शेतकरी आत्महत्या होणाऱ्या जिल्ह्यांत, उत्तर महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण जिल्ह्यात सिंचनातून समृद्धी आणण्यासाठी शेतीमध्ये भरीव गुंतवणूक करण्यासाठी त्यांनी जागतिक बँकेकडून तब्बल साडेचार हजार कोटी रुपये मिळवले होते, त्याची कामे सुरू झालीही होती. लवकरच त्याचे दृश्य परिणाम दिसून येतील. जलयुक्त शिवार ही त्यांची महत्त्वाकांक्षी योजना. संपूर्ण देशामध्येच नाही, देशाच्या बाहेरसुद्धा या योजनेची चर्चा झाली.
राजकारणापलीकडच्या देवेंद्रजींची वेगवेगळी रूपेही मी पाहिली आहेत. दिलदार माणूस तसेच चित्रपटातील गाण्यांची मनस्वी आवड असणारा, खाद्यपदार्थांवर प्रेम करणारा अस्सल वैदर्भीय ही त्यांची रूपे अनेकदा पाहण्यात आली.
चित्रपटातील अनेक गाणी देवेंद्रजींना तोंडपाठ आहेत. त्याचबरोबर ते चांगल्या नकलाही करतात. गप्पाटप्पांच्या मैफिलीमध्ये आपल्या एखाद्या सहकार्याची नक्कलही ते करून दाखवतात. हा माणूस रोज रात्री दोन-अडीच वाजेपर्यंत काम करत राहतो. एखाद्या विषयाला पूर्णपणे वाहून घेण्याची वृत्ती असल्यामुळे अशा गोष्टी ते सहज करताना आपण पाहत असतो. त्यांची प्रचंड अभ्यासू वृत्ती पाहिली की मला तुकोबांची ही ओवी आठवते.
साधूनी बचनाग खाती तोळा गोळा आणिकाते डोळां न पाहवे
साधूनी भुजंग धारितील हातीं आणिके कापती देखोनिया
असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे
तुकोबाराय म्हणतात की, सरावामुळे अगदी अशक्य वाटणाऱ्या गोष्टीदेखील माणसाच्या आवाक्यात येतात. जालिम विष प्याल्यास माणसाला प्राण गमवावे लागतात. पण विषाचा थोडा थोडा अंश पिण्याचा सराव करत जाणारे लोक क्रमाक्रमाने तो अंश वाढवत नेऊन तोळा-तोळा विषदेखील पचवू लागतात. सराव न केलेल्या इतरांना त्यांचे विष पिण्याचे दृश्य डोळ्यांनी बघवतही नाही. विषारी सापाचा दंश माणसाच्या मृत्यूला कारणीभूत होतो, परंतु काही लोक सरावाने सापांना आपल्या हातात पकडतात. त्यांच्यासारखा सराव न केलेले इतर लोक ते दृश्य पाहूनच थरथर कापू लागतात. माणसाच्या जीवनात इतर क्षेत्रांत नेमके असेच घडत असते. एखादी गोष्ट असाध्य आहे, ती प्राप्त करणे कदापि शक्य होणार नाही, असे तिच्याविषयी वाटत असते. परंतु एखादा प्रयत्नवादी मनुष्य खटपट करतो, धडपडतो, यातायात करतो आणि प्रारंभी असाध्य वाटणारी ती गोष्टही त्याच्या दृष्टीने साध्य होते. हे घडू शकते, ते अभ्यासामुळे, सरावामुळे, कठोर परिश्रमामुळे, प्रयत्नामुळे! देवेंद्रजींच्या बाबतीत हे पूर्णपणे लागू पडणारे आहे.
विरोधी पक्षात असताना त्यांनी बाहेर काढलेली भ्रष्टाचाराची प्रकरणे आपण पाहिली आहेतच. जलसंपदा खात्याची किंवा बाकीच्या काही गोष्टींची प्रकरणे त्यांनी आक्रमकपणे बाहेर काढली, त्यामागे त्यांची अभ्यासू वृत्ती आहे हे विसरून चालणार नाही. सत्ताधारी बाकावर असताना विरोधकांचा सर्व भानगडीचा खजिना त्यांच्याकडे असायचा आणि त्यामुळे विरोधकांचे मुजोर पद्धतीचे आक्रमण त्यांनी सहजतेने परतवून लावले. त्यामुळे विरोधकांना आता चांगल ठाऊक झाले आहे की, या माणसाच्या नादी लागता कामा नये. अन्यथा हा आपली लक्तरे विधानसभेच्या वेशीवर टांगेल. विरोधक विधिमंडळात आक्रमक भाषणे करतात. मात्र देवेंद्रजींच्या उत्तरानंतर सभागृहातला माहोल पूर्णपणे बदलून जातो. विरोधक निरुत्तर होऊन गप्प बसतात. विरोधकांचे हल्ले परतवून लावताना आक्रमकता तर पाहिजे, पण त्यात संयम असेल तर त्याचा परिणाम अधिक होतो, हे आता देवेंद्रजींनी दाखवून दिले. मात्र त्यांनी कधीही कोणावर वैयक्तिक टीकाटिप्पणी केली नाही. जी टीका केली, ती पूर्णपणे मुद्द्यांच्या आधारे. पूर्ण माहिती घेऊन, संयमाने, हसत खेळत विरोधकांना चितपट करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती आणि आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर दिल्यानंतर विरोधकही आपण केलेले आरोप विसरून जायचे.
राजकारणातल्या दगाबाजीच्या खेळामुळे देवेंद्रजींना मुख्यमंत्रिपदाने हुलकावणी दिली. आपल्या सहकाऱ्याने दगाफटका केल्याचा घाव झेलणे कठीण होते. पण या घावातून ते सावरले. विरोधकांचा डाव उलटवण्याची त्यांची क्षमता आहे. कारण. वाघाच्या जबड्यात घालुनी हात मोजितो दात, जात ही आमुची पहा चाळून पाने आमुच्या इतिहासाची!
लेखक महाराष्ट्र भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत.