सतर्क राहा; महामारीचा दुसरा स्ट्रेन आलाय !

11

गणेश अ.मोरे (कुरणवाडीकर)

२०१९ मध्ये जगात आलेली भयानक महामारी आज नवीन स्ट्रेनच्या माध्यमातून फोफावली आहे.२०२० मध्ये जगात सर्वत्र भयावह परिस्थिती होती याचे आपण साक्षीदार आहोत.आरोग्य विभाग त्याचबरोबर कायदा सुव्यवस्था आणि एकूण प्रशासन घायकुतीला आलेले आपण पाहिले आहे. माणूस माणसाला संक्रमित करतो आहे. म्हणून सामाजिक दुरी ठेवण्याचा घाट ह्या महामारीने आपल्याला घालून दिलेला आहे. माणूस म्हणून आपण कधी तरी याचा विचार करायलाच हवा नाही का? या महामारीमध्ये चांगले वाईट अनुभव आपणा सर्वांना आलेच आहेत.

याठिकाणी मला काही उदाहरणं द्यावी वाटतात.जी उदाहरणं आपल्याला विचार करायला लावणारी आहेत. आपल्याच राज्यातील सत्य घटना आहे. अमेरिकेत नोकरी करत असलेली बाई कोविडच्या महामारीत स्वदेशी परतली आणि काहीच दिवसात तिच्या वडिलांना कोविडने गाठलं आणि त्यातच वडिलांना जीव सोडावा लागला.अमेरिकेत नोकरी करत असल्यामुळे मुलगी म्हणणारी भरगच्च पैसे घेऊन कोविड सेंटरवर पोहचली तिची इच्छा होती की तिच्या वडिलांना तिच्या फार्म हाऊसवर म्हणजे स्वतःच्या शेतात दहन करायचं.यासाठी तिने चार चाकी गाडीची डिक्की भरून पैसा आणला होता.पण यात कोणीच तिला होकार देत नव्हते . महामारी एवढी भयानक की कोणीही या महामारी मध्ये मरण पावला तर त्याचा अंत्यविधी सरकारी स्मशान भूमीत केला जातो.हा नियम आहे (होता!) किती ही प्रयत्न केला तरी शेवटी नियम सर्वांना सारखेच! आणि हे नियम होते असं म्हणणं ह्या परिस्थितीत तरी आपल्याला योग्य वाटणार नाही. तिने नवीन ambulance खरेदी करण्याची तयारी सुद्धा दाखवली.पण शेवटी सरकारी नियम पालन करणे आवश्यक होते.

वडिलांवर असणारं तिचं प्रेम तिच्या वडिलांना शेवटचं बघायला तरसत होतं. तिच्या वडिलांना ज्या किट मध्ये पॅक करण्याचे काम आरोग्य कर्मचारी करत होता त्याने शेवटचं व्हिडिओ कॉल द्वारे दर्शन घडवून दिलं. यातचं तिने आपलं समाधान मानलं आणि वडिलांना शेवटचा निरोप दिला. पण तिच्या वडिलांना आपल्या मालकीच्या शेतात अंत्यविधी करण्याची सल कायमच तिच्या मनात दाटत राहील. पैसा असून आज तो कवडीमोल होता माणूस किती ही पैसेवाला असला तरी त्याचा अंत्यविधी करण्याचं भाग्य सुद्धा या कोविड मध्ये त्याच्या घरच्यांना किंवा जवळच्या नातेवाईकांना मिळत नाही. हे वास्तव आहे, या वास्तवातून आपण गेलो आहोत आणि जात आहोत परवाची बीड जिल्ह्यातील कमी लोकसंख्या असलेल्या अंबाजोगाई तालुक्यातील आणि अहमदनगर जिल्ह्यातील अंगावर शहारे आणणारी घटना एकाच सरणावर आठ- आठ जणांना दहन करण्यात आले. हे भयानक आहे.ब्राझिल ,अमेरिका या सारख्या देशातील ही परिस्थिती आपण ऐकत होतो ,पाहत होतो ती आता आपल्या पर्यंत येऊन ठेपली याच्यावर विश्वास ठेवणं कठीणचं.

नांदेड सारख्या शहरात अंत्यविधी करण्यासाठी प्रेताला प्रतीक्षा करावी लागते आहे. अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून एमपीएससी परीक्षा देणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना आपला जीव गमावावा लागला. आज वर्ष होऊन गेले तरी ही महामारी आपली पाठ सोडत नाही . भले ही जगभरात वेग वेगळ्या लसी निर्माण केल्या असल्या तरी ही महामारी नियंत्रणात आणण्यासाठी सध्यातरी आपण यशस्वी झालेलो नाही असं म्हणाल तर वावगं ठरणार नाही.

गेल्या दोन तीन महिन्यात थोड्या दिवसांसाठी तरी आपण कोविड गेलाय असं मनात भरले होते. पण अचानक दुसरा स्ट्रेन आला आणि पहिल्यासारखी परिस्थिती निर्माण झालीय हे आपल्याला माहितेय. काळजी घेण्यासाठी आतातरी आपण सज्ज झालो पाहिजे. मास्क दंड लागेल म्हणून लावणं गरजेचं नाही तर स्वतःला आणि समाजाला सुरक्षित वातावरणात ठेवण्यासाठी गरजेचं आहे हे आपण विसरता कामा नये. हे करत असताना आपल्याला कशा प्रकारे काळजी घ्यावी लागेल यासाठी सरकार वेळोवेळी दिशानिर्देश देत आहे आणि आपण ते सुजाण नागरिक म्हणून पाळतोच आहोत.

२०२० मध्ये आपण काय गमावले आणि काय कमावले याचा विचार करत बसण्यापेक्षा आलेल्या दुसऱ्या कोविड स्ट्रेनला कसं थोपावता येईल यासाठी प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. त्यामुळं आपल्याला स्वतः यासाठी विशेष काळजी घ्यावी लागेल तेव्हाच आपण या महामारीला दोन हात करू. नाहीतर येणारा काळ बिकट परिस्थिती निर्माण करेल हे नक्की!,