प्रा. नागोराव तम्माजी उतकर
रावसाहेब अंतापूरकर यांनी प्रशासकीय नोकरी सोडून राजकारणात येण्याच्या निश्चयाने कांही प्रयोग मतदार संघात त्यांनी सुरुही केले.प्रारंभिच्या काळात शिक्षक, प्राध्यापक, इंजिनियर, पत्रकार, सामाजिक संघटना,आणि इतर उपयुक्त गोष्टींचा आधार घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. कांही मुरब्बी दादा राजकारणी आपआपल्या दक्षिण्यासह पक्षाचे तिकिट मिळवून देण्याचे आश्वस्त केले. इंजि.रावसाहेब अंतापूरकर यांना कोणताही राजकीय वारसा नसलेले होते. प्रामाणिक प्रशासकीय अधिकारी होते. पण ह्या राजकारणाच्या मैदानात निव्वळ सचोटीपणा चालत नाही. डावपेच व चाणाक्य निती लागते. ती उणीव असूनही अंतापूरकर आमदार झाले.
सरळ जनते समोर जावून, सहज हितगुज करायचे, कोणते काम असले तर “होते. करु आपण.” “तुम्ही भेटा.” “तुम्ही कुठले?” असेही त्यांचे भोळसट वाक्य असायचे. इतका साधा आणि सरळ माणूस. पण एक सत्य आणि बहुचर्चित गोष्ट अशी की, रावसाहेब अंतापूरकर यांच्या आमदारकीच्या यशाचे श्रेय राजकीय दादा लोकांनीच घेतले, बलाढ्य राजकारण्यांनीच तब्बल आडीच-तीन वर्ष अंतापूरकर यांच्या आमदारकीचा राजकीय उपभोग घेतला. राजकीय दृष्ट्या हे उचीत नव्हतेच. हे एकाकीपण मिळत असतांना, पक्षातील व्यक्तिच कसे वेठबिगारीपणा जोपासत होते, सर्वश्रूत आहे. अशाही संकटातून रावसाहेब अंतापूरकर यांनी जनतेची नाळ तुटू दिली नव्हती. ते कायम पक्षा सोबत राहिले. अपयश आले तरीही, त्यांनी चूल बदल केली नाही. अर्थात पक्षांतर करण्याचे त्यांना जमले नाही. अंतापूरकर यांनी आपल्यात कसल्याच प्रकारची आमदारकी अंगात रुतू दिली नाही.साधेपणा आणि स्वच्छ राजकारण हे गुणवैशिष्ट्ये सदैव स्मरणात राहातील. असा हा अजात शत्रू माणूस, जनसामान्यांच्या मनावर अधिराज्य करत आला.
अलिकडच्या विधान सभेच्या निवडणूकीत भरघोस मताधिक्क्याने विजयी झाले होते. विजयाचा आनंद सहज पचवत होते. ह्या वयातही उत्तम काम करत होते. दैवदुर्विलास असा,ते कायमचे सोडून गेले. एक गुणी,उच्च शिक्षित,समाजभान असलेला मोठा माणूस , निर्मळ आणि स्वच्छ राजकारणी म्हणून कायम प्रतिमा समोर तरळते.कुठलाही लवाजामा न घेता थेट लोकांत मिसळत, हे विशेष !
शिक्षकांच्या सोबत त्यांचा जिव्हाळा होता.बहुतांश शाळांना आपल्या निधीचा वाटा सरळ बहाल केला होता. ते कोणत्याही टक्केवारीचे धनी नव्हते. त्यांचा ज्ञानी लोकांत सतत वावर होता. प्रख्यात लेखक बाबू बिरादार यांच्या सोबत तासंतास चर्चा करायचे. त्यांच्या अनमोल सुचनांचे आज्ञाधारक होवू ऐकायचे. माझ्याशी खूप वेळा मतमतांरे घडायची . तरीही , त्यांच्या निवडणूकीत कुठलीही अभिलाषा न ठेवता मला खारीचा वाटा निर्हेतूक उचलता आला.अनेक वेळा भेटीगाठी, चर्चा, राजकारण, समाजकारण, पत्रकारिकता, शैक्षणिक संस्था,गरिबी-श्रीमंती अशा विविध विषयावर जोरदार चर्चा व्हायची. स्मित हसून आ.अंतापूरकर विषय थांबायचे.
देगलूरला निवांत या म्हणून पुढे गेल्यावर कार्यकर्त्यांला विचारयचे, “यांच नाव काय?” तेव्हा तो कार्यकर्ता मला नंतर, आमदार साहेबांनी असं विचारले. मला हसू आवरायचं नाही.
विधान सभेच्या सार्वजनिक निवडणूकी काळात, त्यांच्या मुळ गावचे लोक स्वखर्चाने टू-व्हिलर, अॕटो घेवून पत्रके वाटत अंतापूरकरवाशीय मतदानासाठी विनंती करत होते. प्रचार करत होते, तेव्हा मी त्यांच्याशी चर्चा केली. ते सगळे शेतकरी,कामगार,व्यापारी आणि आम लोक होते. विवेकवादी माणूस म्हणून रावसाहेब अंतापूरकर यांच्यासाठीच जमेल तसं काम करतोय म्हणून, अंतापूरकरच्या चाहात्यांना चहा पाजला होता. त्या पैकी एक कार्यकर्ता बरोबर आठवण ठेवून माझी, आ.अंतापूरकर यांच्याशी ओळख करुन देत होता. आ.अंतापूरकर स्मित हास्य सतत आठवणीत आहे.
मरखेल येथे नांजिम बॕकेच्या निवडणूका निमित्त्य आले होते, तेव्हा भेट झाली होती. मरखेलसाठी एक “भव्य अभ्यासिका” आणि “संत शिरोमणी गुरु रविदास सभागृह” हवं आहे. आपण निधी उपलब्ध करुन द्यावा. अपेक्षा आहे सर. अशी मागणी केली होती, तेव्हा ते म्हणाले होते, ह्या दोन्ही मागण्या उचीत आहे. तुम्ही या प्रारुप आराखडा तयार करुन, पाठपुरावा करु. आता त्यांच्या अशा अनेक आठवणी थैयथैयतात. मागे आल्यावर अस्थेवाईक बोलले होते. माझा मुलगा निखिल, शाळेतून प्रथम आला म्हणून त्याचा सत्कार आ.अंतापूरकर यांच्या हस्ते झाला होता. ती तसबीर भिंतींवर टांगलेलीच आहे.
कै.मुकुंदराव कांबळे, आ.रावसाहेब अंतापूरकर, ही मंडळी काळाच्या पडद्या आड गेलेले सचोटिचे राजकारणी आणि श्री संभाजीराव मंडगीकर यांची राजकीय दूरदृष्टी कायम प्रभावित करणारी आहे. पैकी मा आ.रावसाहेब अंतापूरकर आपल्यात राहिले नाहीत. ही वेदनादायी घटना आहे. अशी निगर्वी माणसे पुन्हा भेटत नाहीत. कायम आठवणीत असतात.