अॅड शिवाजी जाधव, मुंबई – ७५८८२१०१४३
आपल्याच नात्यागोत्यातील, अत्यंत विश्वासातील लोकं आपापल्या फायद्यासाठी किती बीभत्स होतात हे आपण दलीत पँथरचे सहसंस्थापक, साहित्यिक ज वी पवार यांच्या वरन भात लोंचा नि कोण नाय कोंचा! या सुप्रसिद्ध कादंबरीतून अनुभवलो आहे अगदी तसच किंवा त्याहूनही अधिक बीभत्सपणे आपापल्या हितासाठी अर्थात सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठेसाठी राजकीय नेते आणि घराणे स्वकियांना किंवा आप्तेष्टांना कसे सोडत आहेत किंवा सोडण्यास भाग पाडले जात आहेत हे मागच्या काही वर्षांपासून राज्याच्या राजकारणात पहावयास मिळत आहेत.
शिवसेनेतील फूट या मालिकेतील महत्वाची घटना मानली जाते जेकी संपूर्ण राज्याला किंबहुना देशाला ती जाणवली देखील. बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ पासून मराठी मुद्द्यावरून काही मराठी लोकांना सोबत घेवून स्थापन केलेली शिवसेना आणि पुढे उद्धव ठाकरे की राज ठाकरे हा उत्तराधिकारी निवडताना बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना प्राधान्य दिला त्या वादातून राज ठाकरेंनी २००६ ला बाळासाहेबांची साथ सोडली त्याला कारणही तेच मी शिवसेना चालवण्यासाठी समर्थ असतानाही मला ती संधी दिली गेली नाही म्हणून अर्थात सत्ता आणि प्रतिष्ठेसाठी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली. पुढे राजकीय वाटचाल सुरू केली. पुढचा त्यांच्या राजकीय प्रगतीचा आलेख आणि इतिहास सर्वश्रुत आहे. उद्धव ठाकरे व जयदेव ठाकरे यांच्यातील संपत्तीवरून कायदेशीर वैरही सर्वश्रुत आहे.
हे झालं ठाकरे कुटुंबातील स्वकियांना स्वकीयांनी दिलेला धक्का ठाकरे कुटुंबाच्या विशेषतः बाळासाहेब ठाकरे यांच्या छत्रछायेत एक वेगळी उल्लेखनीय राजकीय उंची गाठलेली अतिशय विश्वासातील लोकं ठाकरेंची अवेळी साथ सोडली किंवा सोडण्यास भाग पाडले गेले.
त्यातील महत्वाचं नाव म्हणजे ज्यांना बाळासाहेबांनी युती सरकारमध्ये मुख्यमंत्री केलं असे नारायण राणे. राणेंचे राजकीय बस्तान तर बाळासाहेब ठाकरेंनीच बसवलं आणि मजबूतही केलं हे रणेही जाहीरपणे मान्य करतात. पुढचं महत्वाचं नाव म्हणजे छगन भुजबळ मुंबई सारख्या महाकाय शहराच्या मनपाचे दोन वेळेस बाळासाहेबांच्या आशीर्वादाने महापौर झालेले पुढे आमदार झालेले छगन भुजबळनेही शिवसेना सोडली.
२००९ ला पक्षाच्या पहिल्याच विधानसभेत जोरदार कामगिरी करणाऱ्या राज ठाकरेंचीही त्यांच्या अगदी जवळच्या अनेकांनी विशेषतः आमदारांनी साथ सोडली.
२०१९ च्या विधानसभेत भाजप शिवसेना एकमेकांसाठी मतदान मागून, काँग्रेस राष्ट्रवादीवर घणाघाती टीका करूनही निकालानंतर फसलेले आकडे पाहून २५ वर्षांपासून असलेली भाजपसोबतची वैचारिक राजकीय युती स्पष्ट बहुमत आले असतानाही
मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंनी तोडली व पुढे त्यांनी काँग्रेस- राष्ट्रवादी सोबत महाविकास आघाडी स्थापन करून सरकार चालवलं. दरम्यान वरळीतील तेंव्हाच्या दोन आजी माजी आमदारांना घरी बसवून पुढे त्यांना विधानपरिषद देण्याचे आश्वासन देऊन आदित्य ठाकरेला उमेदवारी देऊ केली.
निवडणुकीच्या नंतर पक्षातील सर्व वरिष्ठांना बाजूला सारून पुत्र आदित्य ठाकरेला सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदी बसवलं, पक्षातही महत्वाचे निर्णय आदित्यच्या मर्जीने होऊ लागले पक्षाची सूत्रे हळूहळू आदित्यच्या हातात सोपवले जात होते. इतर मंत्र्यांच्या खात्यांत आदित्य व त्यांच्या बगलबच्यांकडून हस्तक्षेप वाढू लागला.
जून २०२२ ला याच कारणाला पुढे करत ज्या शिवसेनेच्या अर्थात बाळासाहेब व आनंद दिघेंच्या आशीर्वादाने नगसेवक, अनेक वेळेस आमदार आणि मंत्री झालेले एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्याच जोरावर राजकारणात स्थिरस्थावर झालेल्या दोन तृतीयांश पेक्षा जास्त आमदारांना सोबत घेवून बंडखोरी केली ज्यात रामदास कदम, दादा भुसे, संदीपान भुमरे, संजय राठोड, संजय शिरसाट, भरत गोगावले, यशवंत जाधव, प्रकाश सुर्वे, मंगेश कुडाळकर इत्यादी अनेक कट्टर म्हणवणारे शिवसेनेच्या नेत्यांचा समावेश आहे. अनेक नेते आणि खासदारही शिंदेंसोबत गेले. पुढे भाजपसोबत सरकार स्थापन केलं शिंदे मुख्यमंत्री झाले आणि शिवसेना पक्ष नाव व चिन्ह मिळवलं.
या वर्षाच्या एप्रिल महिन्यात राज्याला किंबहुना संपूर्ण देशाला धक्का बसला जेंव्हा अजित पवार शरद पवारांची साथ सोडून भाजप व शिवसेनेच्या सरकारमध्ये सामील झाले. अजित पवारांची राजकीय जडणघडण शरद पवारांमुळेच झाली याला स्वतः अजित पवार सुद्धा नाकारनार नाहीत. अनेक वेळेस उपमुख्यमंत्री, आघाडीच्या सर्वच सारकरांमध्ये महत्वाचे मंत्रिपद आशा अनेक संधी अजित पवारांना शरद पवारांमुळेच मीळाल्या. शरद पवारांनंतर पक्षाचं नेतृत्व सुप्रिया सुळेंकडे असावं याची शरद पवारांनी खबरदारी घेतली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ५५ पैकी ५० पेक्षा जास्त आमदार सोबत असल्याचा दावा करत आम्हीच खरी राष्ट्रवादी म्हणत अजित पवार आणि अनेक मोठे नेते ज्यात प्रफुल्ल पटेल, छागन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, संजय बनसोडे, धर्माराव आत्राम, अनिल भाईदास पाटील इत्यादी बड्या नेत्यांचा समावेश आहे ज्यांचे राजकीय बस्तान बसण्यामध्ये शरद पवार, तत्कालीन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा महत्वाचा वाटा आहे त्यांनी शरद पवारांचीच साथ सोडली. राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची यावरून आता निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे.
१९७८ला शरद पवार यांनी सुद्धा सत्तेसाठी तत्कालीन काँग्रेस अर्थात वसंत दादा पाटील यांचं सरकार काँग्रेसमध्ये बंडखोरी करून पाडलं आणि पुलोद सरकार स्थापन केला होता. ज्या काँग्रेसमुळे शरद पवारांचे राजकारण बळकट झाले ज्या काँग्रेस ने शरद पवारांना अनेक वेळेस राज्याचे मुख्यमंत्री केले, राज्याची पूर्ण काँग्रेस ताब्यात दिली पुढे पवारांनीच काँग्रेसची साथ सोडली व राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. शरद पवारांना साथ देणारे आणि पवारांच्या साहाय्याने राजकारणात यशस्वी झालेले अनेक नेते त्यांना २०१४ आणि २०१९ ला पवारांची साथ सोडली त्यात मधुकर पिचड, विजयसिंह मोहिते पाटील, बबनराव पाचपुते, उदयनराजे भोसले, शिवेंद्रसिंहराजे भोसले, पद्मसिंह पाटील, गणेश नाईक, जयदत्त क्षीरसागर, मुंदडा कुटुंबीय इत्यादी बड्या नेत्यांचा व त्यांच्या घराण्याचा समावेश आहे.
एखाद्या राजकीय कुटुंबात फूट पडली आणि राज्याच्या राजकीय पटलावर खळबळ माजली हे काय लोकांना नवीन राहीलं नव्हतं त्यात अजून एका कुटुंबाची ताटातूट झाली ती म्हणजे २०११मध्ये गोपीनाथ मुंडे आणि त्यांचे भाऊ पंडित आण्णा मुंडे व त्यांचे पुतणे धनंजय मुंडे यांची. त्यानंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे.
अगदी नजीकच्या काळात बीड जिल्ह्यातील अजून एका राजकीय कुटुंबाची ताटातूट झाली ती म्हणजे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांची, या वादातून पुढे संदीप आमदार झाले तरीही काका-पुतन्याचे संघर्ष अजून सुरूच आहे.
कौटुंबिक राजकीय विसंवादाला नांदेड जिल्हाही अपवाद ठरला नाही. मधल्या काळात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे भाऊजी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी सुद्धा अशोकरावांची साथ सोडून भाजपमध्ये डेरेदाखल झाले होते. अशोकरावांच्या २०१९ लोकसभा पराभवात भास्करराव यांचा मोलाचा वाटा होता. आता मात्र ते काँग्रेसमध्ये परत गेले आहेत.
जिल्ह्यातील दुसरी दाजी भाऊजीची जोडी ज्यात राजकीय वाद झाले आणि त्यांची ताटातूट झाली ती म्हणजे नांदेड चे खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि लोहा-कंधारचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांची. काल-परवा बाजर समित्यांचे निकाल लागले त्यात श्यामसुंदर शिंदे यांचे पॅनल विजयी झाल्यामुळे उभयंतातील राजकीय संघर्ष वैयक्तिक पातळीवर सुद्धा जाऊन पोचले आहेत. चिखलीकर आणि अशोकराव यांचे आधीचे चांगले संबंधही सर्वपरिचित आहे चिखलीकरांचे राजकीय बस्तान अशोकराव व त्यांचे वडील माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्यामुळेच बसले हे ही नाकारता येत नाही आता मात्र चव्हाण-चिखलीकर कट्टर राजकीय विरोधक झाले आहेत.
आपले आजोबा राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या विरुद्ध त्यांचे नातू संभाजीपाटील निलंगेकर यांनी थेट निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा अजूनही लातूर जिल्ह्यातील निलंगेकर कुटुंबातील हा राजकीय वैर सुरूच आहेत.
लातूरलगतचा जिल्हा धाराशिवमध्येही राजेनिंबाळकर-पाटील घराण्यातील जीवघेने राजकीय संघर्ष सुरूच आहे. पद्मसिंह पाटील आणि पवन राजेनिंबाळकर यांच्या राजकीय संघर्षातूनच पवनराजे यांचा खून झाल्याचे बोलले जाते त्याच खुनाच्या आरोपात आणि खटल्यात पद्मसिंह पाटील अजूनही कोर्टाच्या पायऱ्या झिझवताहेत. पुढचा संघर्ष आता राणाजगजितसिंह पाटील आणि ओम राजेनिंबाळकर यांच्यात सुरू आहे किंबहुना विकोपाला गेला आहे.
साताऱ्यातील छत्रपती घराण्यातील उदयनराजे भोसले आणि शिवेद्रसिंहराजे भोसले यांच्यातील संघर्षही संपूर्ण राज्याला माहीत आहे.
नगरमधील जगताप-कर्डीले, कोल्हे-विखे नातेवाईकांतील आणि पाचपुते काका-पुतणे यांच्यातील राजकीय संघर्षही महाराष्ट्राला परिचित आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील नाईक कुटुंबीय यांच्यातही जोरदार राजकीय संघर्ष आहे मनोहर नाईक, सुधाकरराव नाईक आणि आताचेच उदाहरण घ्यायचं झालं तर इंद्रनील नाईक, ययाती नाईक आणि निलय नाईक यांच्यातील राजकीय वैर घेता येईल.
जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे आणि त्यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांच्यातील वाद तर अत्यंत विकोपाला पोचले आहेत किंवा ते नातंही आता उरलं नाहीए.
पुण्याचे टिळक कुटुंबीय सुद्धा एकमेकांच्या विरोधात आहेत. रोहित टिळक काँग्रेसमध्ये आहते तर दिवंगत मुक्तताई टिळक त्यांचे कुटुंबीय भाजपमध्ये.
ज्या एकनाथ खडसेंचे राजकीय बस्तान भाजपमुळे बसलं शेवटी त्यांनीही भाजपला सोडचिठ्ठी दिली किंवा त्यांना सोडायला भाग पाडलं गेलं त्यांची सून राक्षताई खडसे भाजप मध्ये तर ते स्वतः व त्यांची मुलगी रोहिणी खडसे राष्ट्रवादीत आहेत.
आश्चर्य तर तेंव्हा वाटलं जेंव्हा राजकीय स्वार्थासाठी बाप-मुलांची ताटातूट झाली. खासदार गजानन कीर्तिकर व त्यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर वडील शिवसेनेत अर्थात शिंदेंसोबत तर मुलगा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत. माजी मंत्री सुभाष देसाई व त्यांचे चिरंजीव भूषण देसाई यांचीही अशीच गत झाली आहे वडील शिउबाठा मध्ये तर मुलगा शिवसेनेत.
असे अनेक उदाहरणं घेता येतील जे स्वतःच्या हितासाठी अर्थात कोणत्याही निवडणुकीत उमेदवारी, सत्तेत भागीदारी आणि पक्ष संघटनेत जबाबदारी न मिळणे किंवा न देणे या प्रमुख कारणांमुळेच अत्यंत टोकाचे पाऊल उचलले किंवा उचलायला भाग पाडले गेले, आप्तेष्टांना, स्वकीयांनाही दुखावले गेले आता हीच राजकीय मंडळी सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी किती प्रामाणिक पणे काम करत असेल यात आपसूकच शंका निर्माण होते. जे कुटुंबाचे, नातेवाईकांचे किंवा ज्यांच्यामुळे राजकीय अस्तित्व निर्माण झाले त्यांचे होऊ शकले नाहीत ते सर्वसामान्य जनतेचे कसे होऊ शकतील?