राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीची मतमोजणी संपन्न झाली आहे. पुणे पदवीधर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण लाड यांनी या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. विधान परिषदेच्या लक्ष लागून राहिलेल्या पुणे मतदारसंघाणे भाजपला जोरदार धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांनी 48 हजार 824 मतांनी भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांचा पराभव केला आहे. शुक्रवारी सकाळी 7.15 वाजता निकाल जाहीर झाला आहे.
या निवडणुकीत अरुण लाड यांना तब्बल 1 लाख 22 हजार 145 मते मिळाली आहेत, तर संग्रामसिंह देशमुख यांना 73 हजार 321 मते मिळाली आहेत. अरुण लाड यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत या विजयाचे श्रेय संपूर्ण महाविकास आघाडी, सर्व नेते, कार्यकर्ते तसेच पदाधिकारी आणि पाच जिल्ह्यातील मतदारांचा आहे असे व्यक्त केले आहे. अंतिम निकाल येण्यापूर्वीच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जोरदार घोषणाबाजी केली आहे. दुसऱ्या फेरीतील मतमोजणीनंतर लाड यांचा विजय निश्चित झाला आहे.