मनसुख हिरेन संशयास्पद मृत्यु प्रकरणावरुन आता राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी क्राईम ब्रांचचे अधिकारी सचिन वाझे यांच्यावर संशय व्यक्त केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल सभागृहात यावर आक्रमक पवित्रा घेत सचिन वाझेंवर निलंबनाची मागणी केली. आजसुद्धा विधानपरिषदेत याचे पडसाद उमटले. दरम्यान सभागृहातील गोंधळामुळे कामकाज तहकुब करण्यात आले. जोपर्यंत मुख्यमंत्री गप्प, तोपर्यंत कामकाज ठप्प अशी भूमिका आता भाजपने घेतली आहे.
ऊद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेल्या अवस्थेतील निर्जन कार आढळून आली होती. या कारचे मालक मनसुख हिरेन यांनी अगोदरच ही कार चोरी गेल्याची तक्रार नोंदवली होती. त्यानंतर मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यु झाला आहे. हिरेन यांच्या कुटुबियांनी तसेच एटीएसने ही हत्या असल्याचे सांगीतले. दरम्यान मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी सचिन वाझेंवर संशय व्यक्त केला आणि त्यानंतर भाजपने यावर आक्रमक भूमिका घेतली.
आज विधानपरिषदेचे कामकाज बंद पाडण्यात आले. कालसुद्धा विधानपरिषदेत याच मुद्द्यावरुन प्रचंड गदरोळ घालण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट करावी असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. “जोपर्यंत मुख्यमंत्री गप्प, तोपर्यंत कामकाज ठप्प” असा ईशाराच भाजपकडून देण्यात अाला आहे.
सचिन वाझे हे सध्या याप्रकरणात संशयाच्या भोवर्यात अडकले आहे. सचुन वाझे यांनी पत्रकार अर्णव गोस्वामी यांस घरात जाऊन अटक केली होती आणि अर्णव हा भाजपचा हस्तक आहे. त्यामुळे भाजपला सचिन वाझेंचा राग आहे असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल सभागृहात म्हटले. सचिन वाझे यांचा शिवसेनेशी जवळचा संबंद्ध असल्याचेही बोलले जाते.