केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आणि गलथानपणामुळे देशभरात कोरोनाचे संकट अत्यंत गंभीर झाले आहे. बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर न मिळाल्याने लोकांचे मृत्यू होत आहेत. कोरोना संकटाचा सामना करण्यात केंद्र सरकार पूर्णतः अपयशी ठरले असून देशात आरोग्य आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे.
कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लसीकरणाशिवाय दुसरा पर्याय नाही. केंद्र सरकारने सर्वांच्या मोफत लसीकरणाची जबाबदारी झटकली आहे. पण राज्य सरकारने सर्वांना मोफत लस दिली पाहिजे. तसेच या संकटकाळात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त लोकांना शक्य ती सर्व मदत करावी. असे आवाहन महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी केले आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली व काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सर्व कार्याध्यक्ष, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षांची ऑनलाईन मिटिंग संपन्न झाली.
यावेळी एच. के. पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या हेल्पलाईन आणि कोरोना मदत व सहाय्य केंद्राकडून सुरु असलेल्या मदत कार्याची व काँग्रेस पक्षातर्फे राज्यभरात सुरु असलेल्या रक्तदान शिबिरांची माहिती घेतली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीजी व राहुल गांधीजी यांनी केलेल्या आवाहनाप्रमाणे या संकटकाळात नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जनतेला शक्य ती सर्व मदत करावी. असे आवाहन त्यांनी केले.