परभणी जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्क उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासनाने कोविड सेंटर्स मधून उभारलेल्या ऑक्सीजन प्लांट, टँकला तातडीने सुरक्षा पुरविण्याचे आदेश बजावले आहेत.
नाशिक येथील ऑक्सीजन प्लांटमधील वायू गळतीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्हा शासकीय रुग्णालय, आयटीआय, जिल्हा परिषद नविन इमारत या ठिकाणी उभारलेल्या ऑक्सीजन प्लांट आणि टँक यांना सुरक्षा पुरविण्याकरीता एक एजन्सी नियुक्त करण्याचे आदेश बजावले आहेत.
सदरील एजन्सी मार्फत सुरक्षा रक्षक पुरवून त्या त्या परिसरात सर्वसामान्य व्यक्तींना जावयास मनाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी बुधवारी सांयकाळी सुरक्षा पुरविण्याबाबत आदेश काढला आहे.