डिलीट ट्विटच्या मुद्यावरून आता मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले स्पष्टीकरण !

12


राज्यात मोफत लस देण्याच्या विचार आघाडी सरकार करत आहे असे विधान राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केल्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून माहिती दिली होती. मात्र काही वेळातच आदित्य ठाकरे यांनी ते ट्विट डिलिट केले होते यावरून विरोधकांनी आघाडी सरकारला आणि मंत्री आदित्य ठकरे यांना निशाणा साधत जोरदार टीका केली होती. तसेच काँग्रेसने सुद्धा या एक तरफेच्या निर्णयावर नाराजी दर्शवत राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षाला खडेबोल सुनावले होते.


आता या डिलीट ट्विटच्या मुद्द्यावर खुद्द मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तीन दिवसांपूर्वी मी माझं ट्विट डिलीट केलं होतं. कोणताही संभ्रम किंवा गोंधळ निर्माण होऊ नये म्हणून मी ट्विट डिलीट केलं होतं. आता मंत्रिमंडळाने मोफत लसीकरणाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे ही बातमी शेअर करण्याची हीच योग्य वेळ आहे, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी टीका करणाऱ्यांना जोरदार टोला लगावला आहे.


आज मंत्री मंडळाच्या झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांचं मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या संकटातून नागरिकांचे संरक्षण व्हावं म्हणून कर्तव्य म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे. लवकरात लवकर ही लसीकरण मोहीम वेगाने पूर्ण करण्यात येईल. राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आमचं कर्तव्य म्हणून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे, असं आदित्य यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.