गडचिरोली जिल्ह्यात मागील काही दिवसांत नक्षलवादी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. गडचिरोलीतील एटापल्ली तालुक्यातील बर्गी या गावात नक्षलवाद्यांनी काल रात्री १०:३० च्या दरम्यान हल्ला केला. या हल्ल्यामध्ये बर्गीचे माजी ऊपसरपंच आणि आदिवासी विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते रामा तलांडी यांची हत्या करण्यात आली आहे.
बर्गी येथील लग्नसमारंभात साध्या वेशात नक्षलवाद्यांनी प्रवेश केला. त्यानंतर अचानक गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात रामा तलांडी यांचा जागीच मृत्यु झाला. दरम्यान हल्ला केल्यानंतर नक्षलवाद्यांनी लगेच जंगलात पळ काढला.
रामा तलांडी हे सलग १० वर्षे बुर्गी गावाचे सरपंच होते. युवा आणि विकासक राजकारणी म्हणून त्यांची परिसरात अोळख होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांअगोदर बुर्गी येथील पोलिस स्टेशन ईमारतीचे ऊद्घाटन केले होते. त्यावेळी तलांडी यांनी फडणवीसांना रस्ते आणि मोबाईल टॉवरची मागणी केली असल्याचे स्थानिकांकडून सांगीतले जाते.
गडचिरोली जिल्ह्यात मागील महिनाभर नक्षलविरोधी अभियान राबवण्यात आले. यामध्ये अनेकदा सी – ६० जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमकी झाल्या. या कारवायांमध्ये खोब्रामेंढा जंगलात पाच नक्षलवादी ठार करण्यात आले. यावेळी घटनास्थळावरुन मोठ्याप्रमाणाय नक्षली साहित्यसुद्धा जप्त करण्यात आले होते.