राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राज्यात 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये फारसा प्रभाव नसलेल्या शिवसेनेनेही यंदा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. औरंगाबादमधील ग्रामपंचायंतींवर भगवा फडकवण्यासाठी राज्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी कंबर कसली आहे. त्यामुळे त्यांनी गावागावात बैठका घ्यायला सुरुवात केली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेला यश मिळवून देण्यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत लक्ष घातले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात 618 ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहेत. सदरील निवडणुकीसाठी सत्तारांच्या अनेक गावांमध्ये बैठका सुरू आहेत. जिल्ह्यातील ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. जिल्ह्यातील सगळ्याच तालुक्यांमध्ये त्यांचा संपर्क दौरा सुरु असून यादरम्यान ते विविध गावांमधील कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत.