औरंगाबाद : मनपा निवडणुकीसाठी ताकदीने कामाला लागा : अशोकराव चव्हाण

15

औरंगाबाद महानगपालिका निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे. या मनपा निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळवून देण्यासाठी आत्तापासून कामाला लागा, असा सल्ला माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी कार्यकर्त्यांना दिला आहे.

गांधी भवन औरंगाबाद याठिकाणी आयोजित कऱ्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. चव्हाण म्हणाले की, “औरंगाबाद मोठे शहर बनत चालले आहे. पण, २५ वर्षांपासून तोच पाण्याचा आणि जलवाहिनीचा प्रश्न मी ऐकतो आहे. आता हे प्रश्न मार्गी लागले पाहिजेत. काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना महानगरपालिकेत संधी मिळाली पाहिजे. मी नांदेड महानगरपालिकेत करून दाखवले. औरंगाबादेत हे शक्य आहे. गरज पडल्यास मदत करेन” असही ते म्हणाले. शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यासाठी सोनिया गांधी उत्सुक नव्हत्या मात्र, भाजपला रोखण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत येण्याची गरज त्यांना पटवून दिली. मी त्या बैठकीला होतो. हेही सांगायला ते विसरले नाहीत.

यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे, प्रदेश पदाधिकारी अशोक साय्यना, प्रकाश मुगदिया, शहराध्यक्ष हिशाम उस्मानी, जयप्रकाश नारनवरे, यांची भाषणे झाली. निलेश अंबेवाडीकर यांनी सूत्रसंचलन तर हमद चाऊस यांनी आभार मानले.