‘ऑस्ट्रेलियन वृत्तपत्र म्हणतं मोदी मेलेल्या सरकारी व्यवस्थेचे माहुत’; मात्र, हत्ती हालचाल करीत आहे : सामना अग्रलेख

31

प्रख्यात जागतिक व्यंगचित्रकार डेव्हिड रोवे यांनी पंतप्रधान मोदींवर एक जहाल व्यंगचित्र रेखाटून परिस्थितीचे गांभीर्य समोर आणले आहे. एक अगडबंब हत्ती जमिनीवर मरून पडला आहे व त्या मेलेल्या हत्तीवरील अंबारीत श्री. मोदी हे माहुताच्या भूमिकेत बसले आहेत. ‘मेलेल्या सरकारी व्यवस्थेचा माहुत’ अशा शिर्षकाचे हे टोकदार व्यंगचित्र ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहे.
त्यावर समनाने जोरदार अग्रलेख प्रसिद्ध केला आहे.

वाचा सविस्तर सामना अग्रलेख….

केंद्र सरकार व राज्य सरकारने खांद्याला खांदा भिडवून संकटाशी मुकाबला केला तर कोरोनाला सहज पराभूत करता येईल. या सर्व काळात अनेक चांगल्या बातम्यांमुळे मन उत्साही होत आहे. सिरम कंपनीचे ‘लस उत्पादक’ पुनावाला यांनी अमेरिका कच्चा माल पुरवत नसल्याने लस उत्पादनात अडथळे येत असल्याचे सांगितले. आता अमेरिकेने कच्चा माल पुरविण्याची तयारी दाखवली आहे. ब्रिटन, सिंगापूरसारख्या देशांनीही आपल्याला वैद्यकीय उपकरणे पाठवली आहेत. दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय राजकीय संबंधांचे हे यश आहे हे मान्य केले तर त्याबद्दल मोदी सरकार कौतुकास पात्र आहे. पण देशाची स्थिती कोरोनासंदर्भात गंभीरच आहे व कोरोनाचा ज्वर उतरायला तयार नाही, हे सत्यदेखील तितकेच जहरी आहे! व्यवस्थेचा हत्ती मरून पडल्याचे चित्र परदेशी प्रसारमाध्यमांनी भडक रंगात रंगवले आहे. हत्तीने पुन्हा हालचाल सुरू केली असून हत्ती लवकरच उभा राहील असे आशादायी चित्र निर्माण झाले तर बरे!

पंतप्रधान मोदी यांनी मान्य केले आहे की, कोरोनाच्या दुसऱया लाटेच्या तुफानात देश मुळापासून हादरून गेला आहे. पंतप्रधानांचे हे म्हणणे चुकीचे नाही. पंतप्रधानांनी असेही सुचवले आहे की, उगाच अफवा पसरवून गोंधळात भर टाकू नका हेसुद्धा बरोबर आहे. मुळात अफवा कोण पसरवीत आहेत? मनमोहन सिंग, राहुल गांधी, केजरीवाल, उद्धव ठाकरे, प्रियंका गांधी, ममता बॅनर्जी कोरोनासंदर्भात अफवा पसरवतात व त्यामुळे देशाची स्थिती गंभीर झाली असे कुणाला वाटत असेल तर देशातील गंभीर स्थितीबाबत जगभरातील प्रसारमाध्यमांनी मांडलेली चिंता समजून घेतली पाहिजे. हिंदुस्थानच्या कोरोना स्थिती हाताळण्याच्या प्रकारावर जगातून टीका होत आहे. ‘द गार्डियन’, ‘न्यूयॉर्क टाइम्स’, ‘वॉशिंग्टन पोस्ट’सारख्या प्रमुख दैनिकांनी तर मोदी सरकारवर कठोर प्रहार केले आहेत. प्रख्यात जागतिक व्यंगचित्रकार डेव्हिड रोवे यांनी पंतप्रधान मोदींवर एक जहाल व्यंगचित्र रेखाटून परिस्थितीचे गांभीर्य समोर आणले आहे. एक अगडबंब हत्ती जमिनीवर मरून पडला आहे व त्या मेलेल्या हत्तीवरील अंबारीत श्री. मोदी हे माहुताच्या भूमिकेत बसले आहेत. ‘मेलेल्या सरकारी व्यवस्थेचा माहुत’ अशा शिर्षकाचे हे टोकदार व्यंगचित्र ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहे. हे व्यंगचित्र देश म्हणून आपली मानहानी करणारे आहे. पण या मानहानीबद्दल दिल्लीश्वर कोणाला जबाबदार धरणार आहेत? हिंदुस्थानातील कोरोना परिस्थितीवर चिंता व्यक्त करणाऱया भूमिका देशातील अनेक बुद्धिवंत, स्वयंसेवी संस्था, कार्यकर्ते मंडळी ‘ट्वीटर’सारख्या समाजमाध्यमांतून मांडीत असतात. मात्र आता त्यांच्या ‘ट्विट’वर बडगा उगारण्यात
आला आहे.

ही सर्व ‘ट्विटस्’ हटविण्याचे फर्मान आता सुटले आहे. हे खरे असेल तर हा मुस्कटदाबीचाच प्रकार आहे. अर्थात या सर्व फेक न्यूज आहेत असे सरकारचे म्हणणे आहे. पंतप्रधान मोदी व त्यांचे सरकार कोरोनासंदर्भात काहीच करत नाही व सगळेच नुसते हातावर हात ठेवून बसले आहेत. अशाप्रकारची टीका सर्वत्र होत आहे. अशावेळी देशातील गंभीर परिस्थितीवर व्यक्त झालेली मतं हटविण्याचे प्रकार हासुद्धा टीकेचाच विषय आहे. कारण त्यामुळेही जागतिक मंचावर मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होतील. अर्थात कोरोनाच्या दुसऱया लाटेचे गांभीर्य लक्षात घेऊन आता पंतप्रधान मोदी यांनी चांगल्या तसेच प्रभावी उपाययोजनांची सुरुवात केली आहे. ‘पीएम केअर निधी’द्वारे देशभरात 551 ऑक्सिजन उत्पादन केंद्रे उभारण्यात येणार असल्याची घोषणा केंद्र सरकारने केली. हे स्वागतार्हच आहे. देशातील जवळजवळ प्रत्येक जिल्हय़ातील शासकीय रुग्णालयांत ऑक्सिजन प्लॅण्ट उभारले जातील. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माध्यमातून ऑक्सिजनचे हे प्लॅण्ट उभारले जाणार आहेत. दुसरे असे की, ऑक्सिजन उपकरणे आणणाऱया जहाजांवर कोणतीही विशेष करआकारणी केली जाणार नसल्याचेही केंद्र सरकारने स्पष्ट केले. कोरोना संकटात केंद्र सरकार ठामपणे राज्यांच्या पाठीशी उभे राहील अशी ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी दिली आहे. मुंबईतील भारत पेट्रोलियमच्या आवारात जम्बो कोविड सेंटर उभारण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली. महाराष्ट्र सरकारने यासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली होती व केंद्राने ती दिली हे महत्त्वाचे. हे यासाठीच सांगायचे की, देशापुढील कोरोना संकट गंभीर आहे. पंतप्रधान मोदी सांगतात त्याप्रमाणे पहिल्या लाटेशी यशस्वी लढा दिल्यावर दुसऱया लाटेच्या तुफानात यंत्रणा थोडी ढिली पडली. 

आता तयारी तिसऱया लाटेशी मुकाबला करण्याची आहे. अर्थात त्यासाठी एक तर दुसऱया लाटेचे तुफान थांबवायला हवे आणि  तिसऱया लाटेस थोपविण्यासाठी मजबूत बांध घालून सरकारने सर्वप्रकारे सज्ज राहायलाच हवे. मुंबई महानगर क्षेत्रात 14 ऑक्सिजन प्लॅण्ट स्वतंत्रपणे उभारले जात आहेत हेसुद्धा महत्त्वाचे. मुंबईतील कोरोना संक्रमण गेल्या चार दिवसांत 32 टक्क्यांनी घटले ही सकारात्मक बाब आहे. कोरोना संसर्ग ओसरतोय हे चांगले चित्र आहे, पण यंत्रणेस गाफील राहून चालणार नाही. केंद्र सरकार व राज्य सरकारने खांद्याला खांदा भिडवून संकटाशी मुकाबला केला तर कोरोनाला सहज पराभूत करता येईल. या सर्व काळात अनेक चांगल्या बातम्यांमुळे मन उत्साही होत आहे. सिरम कंपनीचे ‘लस उत्पादक’ पुनावाला यांनी अमेरिका कच्चा माल पुरवत नसल्याने लस उत्पादनात अडथळे येत असल्याचे सांगितले. आता अमेरिकेने कच्चा माल पुरविण्याची तयारी दाखवली आहे. ब्रिटन, सिंगापूरसारख्या देशांनीही आपल्याला वैद्यकीय उपकरणे पाठवली आहेत. दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय राजकीय संबंधांचे हे यश आहे हे मान्य केले तर त्याबद्दल मोदी सरकार कौतुकास पात्र आहे. पण देशाची स्थिती कोरोनासंदर्भात गंभीरच आहे व कोरोनाचा ज्वर उतरायला तयार नाही, हे सत्यदेखील तितकेच जहरी आहे! व्यवस्थेचा हत्ती मरून पडल्याचे चित्र परदेशी प्रसारमाध्यमांनी भडक रंगात रंगवले आहे. हत्तीने पुन्हा हालचाल सुरू केली असून हत्ती लवकरच उभा राहील असे आशादायी चित्र निर्माण झाले तर बरे!