मनसुख हिरेन यांचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त! अहवालात काय आलेत निष्कर्ष?

9

प्रसिद्ध ऊद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर ज्वलनशील पदार्थांनी आढळून आलेल्या कारचे मालक मनसुख हिरेन यांचा काल मुंब्रा परिसरात मृतदेह आढळला आहे. त्यांच्या या संशयास्पद मृत्युला पोलिसांनी आत्महत्या असल्याचे सांगीतले. मात्र मनसुख यांच्या कुटुंबियांनी पोलिसांचे हे दावे फेटाळून लावले होते. तसेच मनसुख यांच्या कुटुंबियांनी जोपर्यंत शवविच्छेदन अहवाल प्रापत होत नाही तोपर्यंत मृतदेह स्विकारणार नसल्याची भूमिका घेतली होती. नुकताच मनसुख यांचा शवविच्छेदन अहवाल ठाणे पोलिसांना प्राप्त झाला आहे.

ठाणे महापालिकेच्या छ.शिवाजी महाराज रुग्णालयात मनसुख हिरेन यांच शवविच्छेदन करण्यात आलं. यामध्ये मनसुख यांचा पाण्यात बुडाल्याने मृत्यु झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच हिरेन यांचा व्हिसेरा पुढील तपासासाठी फॉरेन्सीक लॅबला पाठवण्यात येणार आहे. एका खाजगी वाहनीने यासंबंद्धिचे वृत्त दिले आहे.

मुकेश अंबानी यांच्या घरासमोर ज्वलनशील पदार्थांनी भरलेली निर्जन स्कॉर्पिअो कार आढळून आली होती. यामध्ये दहशतवादी संघटनेचा ऊल्लेख केलेला तसेच खंडणीचासाठीची एक चिठ्ठीसुद्धा आढळली होती. त्यानंतर पोलिस‍ांनी कारचे मालक मनसुख यांना गाठताच मनसुख यांनी अगोदर गाडी चोरी गेल्याची तक्रार केल्याचे समोर अाले होते. यानंतर मनसुख यांची चौकशी करण्यात आली होती. परवा रात्रीपासून मनसुख गायब होते. काल अचानक त्यांचा मृतदेह आढळून आला आहे.

मनसुख हिरेन यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना पत्रसुद्धा लिहीले होते. यामध्ये मी पिडीत असून मला आरोपीसारखी वागणूक दिली जात असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. तसेच मी या चौकशीस कंटाळलो आहे. आपण माझी यातून सुटका करा आणि पोलिस आणि पत्रकारांपासून मला संरक्षण द्या अशी मागणीसुद्धा त्यांनी या पत्रात केली आहे. विरोधकांनी हा मुद्दा ऊचलून धरला असून संबंद्धित प्रकरणाची चौकशी एनआयएकडे सोपवण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सध्या एटीएस या प्रकरणाचा तपास करते आहे.