बाळासाहेब थोरात त्यांचे मोठे विधान, संपूर्ण देशभरात भाजपाची पीछेहाट सुरु झाली !

810

पश्चिमबंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूलने दणदणीत विजय मिळवल्यावर संपूर्ण राज्यभरातुन ममता बॅनर्जी यांचे कौतुक होताना दिसत आहे. त्यात आता काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सुद्धा सूचक विधान केले आहे. कोरोनाशी लढण्याऐवजी पंतप्रधान व सर्व केंद्रीय मंत्री सत्तेसाठी निवडणुका जिंकण्यात व्यस्त आहेत. लोकांना शाश्वत विकास पाहिजे भूलथापा व जाहिरातबाजी नको आहे. म्हणून मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या भाजपा बद्दल भारतीय जनतेमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे. भाजपची पिछेहाट सुरू झाली अाहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.


पुढे बोलताना मंत्री थोरात म्हणाले, जनतेला शाश्वत विकास व सुरक्षितता हवी आहे. मात्र भाजपने मागील सात वर्षात फक्त जाहिरातबाजी केली आहे. विकासाचे काम केले नाही. महागाईने जनता त्रस्त झाली असून देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. देशात हे सर्व मोठे प्रश्न निर्माण झाले असताना कोरोनाचे मोठे उभे संकट उभे राहिले आहे. मूलभूत प्रश्नांकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले असल्याने भाजपकडून जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. कोरोना संकट रोखणे हे काँग्रेसने प्रथम ध्येय मानले आहे.


पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांनी मिळवलेल्या ऐतिहासिक विजय हा भाजपला मोठा चपराक देणारा आहे. आता तरी केंद्र सरकारने निवडणुकांच्या राजकारणा ऐवजी जनतेच्या विकासाचे राजकारण करत कोरोना संकटात औषधोपचार, ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करून आर्थिक मदत करावी, अशी मागणी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.