बँका तगादा लाऊन मानसिक छळ करीत आहेत; कर्जाची सक्तीने होणारी वसुली थांबवा : प्रहार

13

परभणी शहरासह जिल्ह्यातील छोटे-मोठे व्यापारी उद्योजक व शेतकऱ्यांकडील थकीत कर्ज वसुली तात्काळ थांबवावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाने जिल्हा प्रशासनाला सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. वेळोवेळी कडक निर्बंध तसेच लॉक डाऊन लावल्यामुळे देशासह परभणी जिल्हयातील उद्योग व्यवसाय, व्यापार व शेती क्षेत्र मोठया प्रमाणावर प्रभावीत झाले आहेत

सततच्या निर्बंध व लॉकडाऊनमुळे व्यापारी, उद्योजक व शेतकरी यांची मोठया प्रमाणावर आर्थिक कोंडी झालेली आहे. त्यामुळे बँकेकडुन उद्योग व्यवसायासाठी किंवा घर बांधकामासाठी शिवाय शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडण्याची क्षमता यांच्यात उरलेली नाही.

तसेच लॉकडाऊनमुळे भाजीपाला, शेतीमाल व इतर नाशवंत उत्पादने बाजारपेठेमध्ये पोहचवू न शकल्यामुळे शेतकरी वर्गही आर्थिक संकटात आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी घेतलेल्या कर्जाच्या वसुलीबाबत शासकीय बँका तगादा लाऊन मानसिक छळ करीत आहेत.

सर्व शासकीय बँकांना सक्तीने वसुली करु नये किंवा वारंवार वसुलीच्या नोटीसा पाठवुन मानसिक त्रास देऊ नये अशा सूचना द्याव्यात अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, शहर प्रमुख पिंटु कदम, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.