अशीही पळवापळवी : परभणीसाठीचा ऑक्सीजन टँकर बीडच्या जिल्हा प्रशासनाने पळविला

43

परभणी शहरासह जिल्ह्यातील कोविड सेंटरमधून सुरळीतपणे ऑक्सीजनचा पुरवठा व्हावा म्हणून कर्नाटकातील बेल्लारी येथून ऑक्सीजन घेवून निघालेला टँकर बीड जिल्हा प्रशासनाने पळविला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयासह अन्य कोविड सेंटरला चाकण जि.पूणे येथून ऑक्सीजनचा पुरवठा होत होता. त्यात सरकारने बदल केला. चाकण ऐवजी बेल्लारी येथून ऑक्सीजनच्या पुरवठ्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे 20 केएल ऑक्सीजन दररोज पुरवल्या जाईल, हे अपेक्षीत होते. काल बेल्लारी येथून निघालेला ऑक्सीजनचा टँकर परभणीला दुपारी पोहचेल असे अपेक्षीत होते. त्या अनुषंगाने प्रशासनास सूचना प्राप्त झाल्या होत्या.

निघालेल्या त्या टँकरवर प्रशासनाचे प्रवासा दरम्यान लक्ष होते. परंतू वरिष्ठ पातळीवरील हालचालीमुळे परभणीला निघालेला टँकर बीड जिल्हाकडे वळविण्यात आला. या प्रकाराबाबत शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी तीव्र संताप व्यक्त केला. सरकारी पातळीवरील उच्चपदस्थ अधिका-यांशी रात्री तात्काळ संपर्क साधून बीड जिल्हा प्रशासनाने टँकर पळविल्या बद्दल तीव्र खंत व्यक्त केली.
हा प्रकार पूर्णतः चुकीचा आहे, असे स्पष्ट केले.

परभणी शहरासह जिल्ह्यातील कोविड सेंटरर्सला शनिवारपर्यंत पुरेल एवढा ऑक्सीजनचा साठा उपलब्ध आहे. असे निदर्शनास आणून जिल्ह्यास उद्या ऑक्सीजनचा तुटवडा भासल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली असेल असे उच्चपदस्थ अधिका-यांना सुनवल्या नंतर वरिष्ठ पातळीवरून शुक्रवारी रात्री परभणी जिल्ह्यास शनिवारी सकाळपर्यंत ऑक्सीजनचा पुरवठा करण्याबाबत जोरदार हालचाली सुरू झाल्या होत्या. एका उच्चपदस्थ अधिका-याने शनिवारी सकाळपर्यंत ऑक्सीजन उपलब्ध करून दिले जाईल, अशी ग्वाही दिली असल्याची माहिती आहे.