पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
वातावरण सकारात्मक आहे, आघाडीचा विजय निश्चित आहे. स्व. भारत नानांनी उभारलेल्या अविरत कार्यामुळे जनता भगीरथ भालके यांना मतरुपी आशीर्वाद देणार हा विश्वास असल्याचं जयंत पाटील म्हणाले.
पंढरपूर-मंगळवेढा ही संतांची भूमी आहे. जवळपास १२ वर्षाहून अधिक काळ महात्मा बसवेश्वर मंगळवेढ्यात राहिले. त्यामुळे महात्मा बसवेश्वर महाराज यांचं स्मारक व्हावं ही भारतनानांची मागणी होती. लोकांच्या भक्ती भावनांचा आदर करत यावर्षीच्या अर्थसंकल्पात अजितदादा पवार यांनी या स्मारकाचीही तरतूदही केली आहे.
भारतनाना माझ्याकडे २४ गावांच्या पाण्याचा प्रश्न घेऊन आले होते. भाजपा सरकारच्या काळात या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं. मात्र आपले सरकार येताच अधिकाऱ्यांच्या बैठका लावून या गावांना २ टीएमसी पाणी देण्याचा निर्णय झाला. भारतनानांनी या भागासाठी अनेक स्वप्नं पाहिली होती. ती स्वप्न पूर्ण होणार, भारतनानांचा भगीरथच ती स्वप्न पूर्ण करणार असल्याचं विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.