पेट्रोल दरवाढीवरून भाई जगतापांचा बॉलीवूड कलाकांरांवर निशाणा

10

देशभरात पेट्रोल-डिझेलचे दरांमध्ये खूप प्रमाणात वाढ झाली आहे. अनेक शहरांमध्ये भाव गगनाला भिडले आहेत. त्याचबरोबर डिझेलही प्रचंड महागले आहे. काँग्रेसच्या काळात झालेल्या पेट्रोल डिझेल दरवाढीवर टीका करणारे बॉलिवूड कलाकार आता इलेक्ट्रिक कार चालवतात का असा खोचक टोला मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगतापांनी लावला आहे.

अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आणि अनुपम खेर यांचे जुने ट्विट दाखवत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. आज पेट्रोल डिझेलच्या किंमतीची वाटचाल शंभरीकडे सुरु असताना हे कलाकार शांत का आहेत असाही सवाल त्यांनी केला आहे. अमिताभ यांनी युपीए सरकारच्या काळात केलेली काही ट्विट पाहत भाई जगताप संतापले आहेत.

कलाकारांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यावेळी सरकारवर टीका केली होती. त्यामध्ये अमिताभ बच्चन यांनी रामायणाचा दाखला दिला होता आणि म्हणाले होते की गाड्या कॅशमध्ये खरेदी करता येतील पण त्यात पेट्रोल टाकण्यासाठी कर्ज काढावे लागेल. त्याचबरोबर अक्षय कुमारनेही सायकल वापरण्यास सुरूवात करावी लागेल, असे म्हटलेले ट्विट जगताप यांनी पोस्ट केले आहे.

पेट्रोलचे दर देशभरात प्रचंड वाढले असून, मुंबईत सोमवारी (८ फेब्रुवारी) पेट्रोलचे दर प्रतिलिटर ९३.४९ रुपये एवढे आहेत. तर इतर शहरातही अशीच परिस्थिती आहे. नागपूरमध्ये प्रतिलिटर ८४.५४ रुपये, ८२.०४ रुपये, नाशिक ८३.२४ रूपये लिटर पेट्रोलचे दर आहेत.