देशात कोरोनाच्या संकटाने धुमाकूळ घातला आहे. अशा काळात अयोध्येत राम मंदिरापाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात लोकशाहीच्या नव्या मंदिराचीही उभारणी सुरु होत आहे. नवीन संसद भवनचा भूमीपूजन सोहळा 10 डिसेंबरला दुपारी 1 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडण्याचा निर्णय सत्ताधारी एनडीएने घेतला आहे.
लोकसभा अध्यक्ष ओम् बिर्ला यांनी स्वतः पंतप्रधान निवासात जाऊन पंतप्रधान मोदी यांना पायाभरणी समारंभाचे निमंत्रण दिले आहे. येत्या गुरुवारी दुपारी 1 वाजता हा भव्य सोहळा पार पडणार आहे. नव्या संसद भवनाची क्षमता ही जुन्या भवनापेक्षा अधिक असून नव्या भवनात एकाच वेळी लोकसभा सदस्यांसाठी सुमारे 888 जागा उपलब्ध असणार आहेत. तर राज्यसभा सदस्यांसाठी 326 पेक्षा अधिक जागा उपलब्ध असतील.
गुजरातच्या एचसीपी डिझाईननं याचा आराखडा बनवला आहे. तर टाटा प्रोजेक्ट याचं बांधकाम करणार आहे. संसदेची जी आत्ताची इमारत आहे तिला अद्याप शंभर वर्षेही पूर्ण झालेली नाहीत. संसदेच्या या नव्या इमारतीला 4 मजले, 6 प्रवेशद्वार असतील. लोकसभेचे 1 हजार, तर राज्यसभेचे साधारण 400 खासदार बसू शकतील अशी बैठक व्यवस्था असणार आहे. सध्या खासदारांना प्रत्येकाच्या आसनासमोर टेबल नाहीत. नव्या संसदेत प्रत्येकासमोर छोटे बाक असणार आहे. या बाकांमध्ये हजेरी नोंदवण्यासाठी, मतदान करण्यासाठी, भाषातंर ऐकण्यासाठी अत्याधुनिक व्यवस्था असेल. याशिवाय 120 कार्यालये, म्युझियम, गॅलरीही या इमारतीत असणार आहे.
टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड या कंपनीला नव्या संसद भवनाच्या बांधकामाचे कंत्राट मिळाले असून बांधकामावर ९७१ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. २०२२ मध्ये स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने नव्या संसद भवनात दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनाने कामकाजास सुरवात केली जाईल.