काही दिवसांपूर्वी हैद्राबाद महानगरपालिकेची निवडणुक पार पडली. या निवडणुकित भाजपाने आपल्या प्रमुख नेत्यांना प्रचारासाठी हैदराबादेत आणलं होतं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री अमित शहा असे भाजपचे रथी महारथी मैदानात उतरले होते. याचा भाजपला फायदा झाल्याचं दिसून आलं होतं.
मुंबई, पुण्यातील महापालिकांच्या निवडणुकांना सव्वा वर्षांचा कालावधी बाकी आहे. भाजपने हैद्राबाद महापालिका निवडणुकीत दिल्लीसह अन्य बडे नेते प्रचाराच्या रिंगणात उतरावल्यावरून येणाऱ्या निवडणुकांमध्ये देखील भाजप आक्रमक असेल असं सध्या चित्र आहे.
यावर शिवसेनेचे नेते व परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजपला खोचक टोला लगावला आहे. ‘भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी फक्त महापालिका निवडणूकच कशाला आमच्याकडे चाळ कमिटीच्या निवडणुका लागणार आहेत, त्यातही त्यांनी उतरावं,’ अशी मिश्किल टीका त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे.