भारतीय जनता पार्टीला एकामागून एक राजकीय धक्के बसत आहेत. अनेक नेत्यांनी पक्ष सोडला आहे. तर अनेक नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीला वर्षभराचा अवधी बाकी आहे. अशातच मुंबईतील भाजपच्या माजी सचिवाने भाजपला रामराम करत शिवबंधन हाती बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईचे भाजप पक्षाचे माजी सचिव समीर देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. समीर देसाई हे काँग्रेसचे माजी खासदार गुरूदास कामत यांचे भाचे आहेत. ते काँग्रेसचे माजी नगरसेवक आहेत. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, भाजपमध्ये योग्य तो मानसन्मान न मिळाल्याने त्यांनी आता शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री ह्या निवासस्थानी हा पक्ष प्रवेश पार पडला आहे.
२०१४ नंतर भाजपला मोठं यश मिळाल्याने अनेक नेत्यांनी भाजपच्या नावेत बसत आपला राजकीय प्रवास केला होता. आता त्यातील अनेक नेते आपल्या पूर्वीच्या पक्षात घरवापसी करण्यास इच्छुक असल्याचं कळतंय.
भाजपमध्ये अनेक नेते सामील झाल्याने, पदांची आणि जबाबदाऱ्या व्यवस्थित मिळत नसल्याच्या तक्रारी असल्याची अंतर्गत माहिती आहे. येणाऱ्या काळात भाजपमध्ये मोठा स्पोट पाहायला मिळू शकतो.