भाजपला मोठा धक्का; शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर आणखी एका मित्रपक्षाने सोडली साथ

15

गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. देशभरातून शेतकऱ्यांना समर्थन वाढत आहे. अशात हे कायदे शेतकरी हिताचे असल्याचे सांगणाऱ्यांची देखील संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

मोदी सरकारने कृषी कायदे आणल्यामुळे पंजाबमधील शिरोमणी अकाली दलाने भाजपची साथ सोडली. या कायद्यांना अकाली दालने विरोध करत, प्रकाशसिंह बादल यांनी शेतकऱ्यांच्या बाजूची भूमिका घेतली. आता राजस्थानातील भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाने भाजपची साथ सोडली आहे.

राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे नेते हनुमान बेनीवाल यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत भाजप मधून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. बेनीवाल म्हणाले, शिवसेना आणि अकाली दलाने आधीच भाजपची साथ सोडली आहे. आता राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीही भाजपपासून वेगळं होत आहे. नरेंद्र मोदींकडे 303 खासदारांचं बळ आहे. त्यामुळेच ते कृषी कायदे मागे घेत नसल्याचं ते म्हणाले. 1200 किमी दूर असलेल्या राजस्थानातून शेतकरी दिल्लीकडे कूच करत आहेत. त्यामुळे मी एनडीए सोडत असल्याची घोषणा करतो, असे बेनीवाल म्हणाले.