विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी भाजपाकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. १ डिसेंबरला पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहेत. ३ डिसेंबरला निकाल जाहीर होईल.
भाजपाकडून औरंगाबाद पदवीधर मतदारसंघासाठी शिरीष बोराळकर, पुणे पदवीधर मतदारसंघासाठी संग्राम देशमुख, नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी संदीप जोशी तर अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी नितीन धांडे यांच्या उमेदवारीची घोषणा दिल्लीतून करण्यात आली आहे.
शिरीष बोराळकर हे पंकजा मुंडे समर्थक म्हणून ओळखले जातात त्यामुळे या निमित्ताने पंकजा मुंडे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्नही भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी केला आहे. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात गेल्यावेळी राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांनी भाजपाचे शिरिष बोराळकर यांचा पराभव केला होता. यंदाच्या निवडणुकीत भाजपाने पुन्हा एकदा शिरीष बोराळकर यांना उमेदवारी दिली आहे. पण यावेळी राष्ट्रवादी-काँग्रेसला शिवसेनेची साथ असणार आहे. त्यामुळे भाजपाची वाट खडतर होऊ शकते.