कोरोनामुळे सध्याची परिस्थिती अत्यंत भयानक आहे परंतु या कठीण प्रसंगात भारतीय जनता पक्ष जबाबदारीने वागण्याऐवजी राज्य सरकारला अडचणीत कसे आणता येईल यातच वेळ घालवत आहे. केंद्र सरकारकडून या संकटात राज्याला भरीव मदत मिळणे आवश्यक आहे, त्यासाठी राज्यातील विरोधी पक्षनेत्यांनी राज्य सरकारसोबत एकत्र येऊन केंद्राकडून जास्तीत जास्त मदत आणण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे.
रेमडेसीवीर, ऑक्सीजन अभावी लोकांचे जीव जात आहेत ते वाचवणे आपली सर्वांची जबाबदारी आहे यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्रातील जनतेशी आपली बांधिलकी जपावी आणि केंद्र सरकारशी दोन हात करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
नाना पटोले पुढे म्हणाले की, कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्यात आलेली असतानाही, वैद्यकीय साहित्य व परवानग्यासाठी केंद्र सरकारकडे दाद मागावी लागते. राज्य सरकार सातत्याने केंद्र सरकारकडे रेमडेसीवीर, ऑक्सीजन व लसींसाठी पाठपुरावा करत आहे. परंतु केंद्र सरकार मात्र महाराष्ट्राशी दुजाभाव करत आहे.
राज्याला दररोज ५० हजार रेमडेसीवीर इंजेक्शन देण्याची राज्याची मागणी असताना केंद्र सरकारने फक्त २६ हजार देण्याला मान्यता दिली आहे. हा महाराष्ट्रावर अन्याय आहे. महाराष्ट्रात भाजपची सत्ता नाही म्हणून मराठी माणसाला इंजेक्शन द्यायचे नाहीत हे बरोबर नाही.