भाजप ईडीचा वापर करत नाही; ईडी पुरावे असल्याशिवाय चौकशी करत नाही : नारायण राणे

48

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडी ने नोटीस बजावली आहे. पीएमसी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी त्यांना २९ डिसेंबरला चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचं वृत्त माध्यमांनी दिलंय.

त्यावर भाजपातील नेते आता प्रतिक्रिया देत आहेत. भाजप नेते नारायण राणे यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. ‘संजय राऊत फक्त बडबड करतात. मग जाऊदेना त्यांना ईडी समोर. भाजप ईडीचा वापर करत नाही. केंद्र सरकार अंतर्गत ईडी आणि सीबीआय आहे. ईडी आणि सीबीआय पुरावे असल्याशिवाय कोणाची चौकशी करत नाही’ असा खोचक टोला नारायण राणेंनी लगावला आहे.

‘राऊतांनी पीएमसी बँकेत गैरव्यवहार केले. एक कोटीला घेतलेली मालमत्ता आता किती कोटीची आहे ? आज त्याची किंमत अकरा ते बारा कोटी आहे. मग ती मालमत्ता एक कोटीला कशी काय मिळाली? आणि मग एक कोटीला कर्ज दाखवायचं, म्हणून ईडीला तक्रार गेली. त्या बँकेची चौकशी सुरू असताना हे पुरावे मिळाले, म्हणून ईडीने ही नोटीस दिली. असंच कोणाला ईडी वैगेरे नोटीस देत नाही’ असा स्पष्ट हल्लाबोल नारायण राणे यांनी केला आहे.