जळगाव महापालिकेत येत्या १८ मार्चला नविन महापौर आणि ऊपमहापौर पदासाठी निवडणुक होणार आहे. या पार्श्वभूमिवरच भाजपच्या चिंतेत वाढ करणारी बातनी समोर आली आहे. रविवार (दि.१४ मार्च) पासून जळगाव महापालिकेतील भाजपचे २७ नगरसेवक नॉट रिचेबल येत आहे. २७ ही नगरसेवक भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा जळगाव शहरात रंगत आहेत.
जळगाव महापालिकेत भाजप बहुमतात आहे. महापौर व ऊपमहापौर यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ १७ मार्च रोजी संपणार आहे. त्यामुळे १८ मार्चला निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली होती. या पार्श्वभूमिवरच माजी मंत्री गिरीश महाजन भाजपच्या नगरसेवकांसोबत बैठक घेणार होते. मात्र ५७ पैकी २७ नगरसेवक रविवार दुपारपासून नॉट रिचेबल आहे. जळगाव भाजपच्या चिंतेत वाढ करणारी ही बाब आहे.
नगरसेवक मुंबईच्या दिशेने रवाना !
२७ ही नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. रविवारी दुपारीच जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी येथील फार्म हाऊसवर हे सर्व नगरसेवक एकत्र आले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यानंतर सर्व नगरसेवक मुंबईच्या दिशेने रवाना होणार असल्याचेसुद्धा बोलले जाते आहे.
जळगाव महापालिकेत ऊपमहापौर पदासाठी शिवसेनेकडून कुलभुषण पाटील यांचे नाव असल्याची चर्चा आहे तर महापौरपदासाठी जयश्री महाजन यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.