आयोध्येतील राम मंदिर निर्माणाला वेग आला आहे. देशभरातून राम मंदिरांसाठी वर्गणी जमा करण्याचे काम सुरू झाले आहे. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या मोहिमेमध्ये पहिली वर्गणी देत मोहिमेला सुरुवात केली आहे. त्यासोबतच अनेक नेत्यांनी, संस्थांनी, राजकीय पक्षांनी वर्गणी द्यायला सुरुवात केली आहे.
भाजपकडून अनेक शहरांमध्ये राम मंदिरासाठी वर्गणी जमा केली जात आहे. उत्तर प्रदेशातील भाजपच्या प्रदेश कार्यालयात रामांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. मात्र सोबत सीतेच्या मूर्ती अथवा प्रतिमेची स्थापना करण्यात आलेली नाही.
यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची यावेळी उपस्थिती होती. भाजप कार्यालयात फक्त रामाची मूर्ती स्थापन करण्यात आली त्यावर शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे.
‘भगवान श्रीराम माता सीते शिवाय अपूर्ण नाहीत का? जर माता सीतेच हरण झालं नसतं तर रावणाचा वध झाला असता का? सत्याच्या लढाईत माता सीतेच काहीच योगदान नाही का? दुःख होतं या पुरुषप्रधान संस्कृतीच्या विचारांच्या भाजप राम आणि सीता यांना वेगळं करत आहेत. हाच प्रयत्न रावणाने पण केला होता.’ अशी टीका प्रियंका यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.