महापौर संदीप जोशी यांच्या पराभवाने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करण्याची चांगलीच संधी महाविकास आघाडीच्या नेत्याना मिळाली आहे. तशा प्रतिक्रिया सुद्धा समोर येत आहेत. त्यामुळे भाजप नेते चांगलेच अस्वस्थ झाले आहेत. विदर्भात एवढे स्टार नेते असताना पराभव झालाच कसा याचा शोध घेतला जात आहे. तर पराभवाचे खापर आपल्यावर फुटू नये म्हणून भाजपचे अनेक नेते सावधगिरी बाळगत आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात भाजपकडे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, भंडारा-गोंदिया मध्ये आमदार परिनय फूके तसेच खासदार सुनील मेंढे, वर्धामध्ये खासदार रामदास तडस आमदार,पंकज भोयर, तर नागपूरमध्ये उर्जावाण मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शहराध्यक्ष प्रवीण दटके, मोहन मते, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे तसेच ग्रामीणमध्ये सुमारे पाच हजार मतांचा गठ्ठा मते असलेले समीर मेघे एवढे स्टार आमदार असताना देखील विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदार संघात महापौर संदीप जोशी यांचा झालेला पराभव भाजपला चांगलाच जिव्हारी लागला आहे.
विशेष म्हणजे पदवीधर मतदारसंघात आजपर्यंत भाजपचा एकही उमेदवार पराभूत झालेला नव्हता. संदीप जोशी हे देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील होते. त्यामुळे कुठे दगा फटका होणार नाही असे सर्वाना वाटत होते. स्वतः फडणवीस यांनी पदवीधरांचा विभागीय मेळावा घेतला होता. ज्येष्ठ नेते दत्ता मेघे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह विदर्भातील सर्व प्रमुख नेते या मेळाव्याला उपस्थित होते.